Former Cricket administrator Sunil Dev passes away: भारतीय क्रिकेट विश्वासाठी गुरुवारी (3 ऑगस्ट) एक दु:खद बातमी समोर आली. भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान देणारे सुनील देव यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. तसेच त्यांचे नुकतेच हार्नियाची शस्त्रक्रिया झाली होती, असे समजत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मॅनेजर आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव सुनील देव यांचे नाव क्रिकेट विश्वात आदराने घेतले जात होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.
सुनील देव यांनी 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे मॅनेजर म्हणून काम पाहिले होते. त्या टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते.
त्यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1996 -1997 साली केलेल्या दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावेळी देखील ते मॅनेजर होते. तसेच 2014 साली इंग्लंड दौऱ्यादरम्यान देखील त्यांनी भारतीय संघाचे मॅनेजर म्हणून भूमिका पार पाडली होती.
सुनील देव यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी अनेकवर्षे काम केले. तसेच ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) क्रीडा प्रशासक असताना अनेक उपसमित्यांमध्येही सदस्य होते.
सुनील देव क्रिकेट प्रशासनात येण्यापूर्वी क्रिकेटही खेळले आहेत. ते यष्टीरक्षक होते. त्यांनी दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीत एक सामना खेळला आहे. हा सामना त्यांनी जम्मू आणि काश्मीर संघाविरुद्ध खेळला होता. त्यावेळी त्यांचे बिशन सिंग बेदी हे त्यांचे संघसहकारी देखील होते.
दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल भारतीय क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.