Champions Trophy 2013: धोनीचा 'तो' सल्ला अन् टीम इंडिया बनली चॅम्पियन, वाचा त्या अविस्मरणीय विजयाची कहाणी

कॅप्टनकूल एमएस धोनीने 10 वर्षांपूर्वी जगातील कोणत्याच कर्णधाराला न जमलेली गोष्ट करून दाखवली होती.
MS Dhoni | Champions Trophy 2013
MS Dhoni | Champions Trophy 2013Dainik Gomantak
Published on
Updated on

Ten Years of Champions Trophy 2013 Victory: भारतीय क्रिकेटसाठी २३ जून हा दिवस खूप स्पेशल आहे. याचदिवशी बरोबर 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जून 2013 रोजी भारतीय क्रिकेट संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे हे चौथे आयसीसी विजेतेपद ठरले होते. तसेच यानंतर अद्याप भारतीय संघाला आयसीसी विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. दरम्यान, हे विजेतेपद जिंकल्यानंतर कॅप्टनकूल एमएस धोनीच्या नावावर मोठा विक्रमही झालेला.

धोनीच्या नावावर मोठा विक्रम

भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेली ही तिसरी आयसीसी ट्रॉफी होती. त्यामुळे तो भारताचा तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला होता. या स्पर्धेपूर्वी भारताने त्याच्या नेतृत्वाखाली 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप या स्पर्धांमध्येही विजेतेपदावर नाव कोरले होते.

त्यामुळे धोनी जगातील असा पहिलाच कर्णधार ठरला, ज्याने टी20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी हे आयसीसीचे तीन विजेतेपदे मिळवली.

असा झालेला अंतिम सामना

भारतीय संघाने 23 जूनला बर्मिंगघमला झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केले होते. या सामन्याला सुरु होण्यासाठी पावसामुळे बराच उशीर झाला होता. 50-50 षटकांचा सामना पावसामुळे 20-20 षटकांचा करण्यात आलेला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात केवळ 7 विकेट्स गमावत 129 धावा करता आल्या होत्या.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या होत्या. तसेच जडेजाने नाबाद ३३ धावा केल्या होत्या. विराट आणि जडेजा यांच्यात 6 व्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 47 धावांची भागीदारी झाली होती. त्यामुळे भारताला 100 धावांचा आकडा पार करता आला होता. या दोघांव्यतिरिक्त शिखर धवनने 31 धावा केल्या होत्या. मात्र, या तिघांशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नव्हती.

इंग्लंडकडून रवी बोपाराने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स ट्रेडवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

  • धोनीचा सल्ला

दरम्यान, फलंदाजीनंतर 130 धावांचा बचाव करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार म्हणून धोनीने खास सल्ला दिला होता, ज्याची नंतर बरीच चर्चा झाली.

धोनीने भारतीय संघाला काय सल्ला दिलेला याबद्दल सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये नासिर हुसेन यांना सांगितले होते की 'सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट वर पाहू नका. देव तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही.'

'तुम्हालाच तुमचा मार्ग शोधावा लागेल. आपण अव्वल क्रमांकाचा संघ आहोत, त्याचप्रमाणे खेळू. जर आपण हरणार असू, तर त्यांना धावा कराव्या लागतील. पण आपण त्यांना धावा सहज करू द्यायच्या नाहीत.'

  • भारताचा विजय

धोनीने दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला लावला.

यावेळी फिरकी गोलंदाजी करणारे आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि सुरेश रैना यांची गोलंदाजी महत्त्वाची ठरली होती. याबरोबरच त्यांना भूवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली होती.

तरी इंग्लंडकडून रवी बोपारा (30) आणि ओएन मॉर्गन (33) यांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली होती. पण ही भागीदारी 18 व्या षटकात इशांत शर्माने तोडली. त्याने एकापाठोपाठ मॉर्गन आणि बोपारा यांना बाद केले होते.

त्यानंतर 19 व्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर जोस बटलर शुन्यावर बाद झालेला, तर टीम ब्रेसनन धावबाद झालेला. त्यामुळे अखेरच्या षटकात इंग्लंडसमोर 15 धावा करण्याचे आव्हान होते. मात्र अखेरच्या षटकात आर अश्विनने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला 20 षटकात 8 बाद 124 धावाच करता आल्या आणि भारताने 5 धावांनी विजय मिळवला.

भारताकडून जडेजाने 4 षटकात 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तसेच आर अश्विनने 15 धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय इशांत शर्मानेही 4 षटकात 36 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या होत्या. उमेश यादवने 2 षटकात 10 धावा देत 1 विकेट मिळवली होती.

याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि सुरेश रैना यांना विकेट मिळाली नाही, पण त्यांनी किफायतशीर गोलंदाजी केली होती. दोघांनाही प्रत्येत 3 षटकात 19 धावा दिल्या होत्या.

जडेजाने केलेल्या अष्टपैलू खेळामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com