Asia Cup 2023, India vs Sri Lanka, Suryakumar Yadav:
आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोर फेरीत मंगळवारी कोलंबोला झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध 41 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादवने क्षेत्ररक्षणात महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण तो बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता. यादरम्यान 7 व्या षटकात सूर्यकुमारने कुशल मेंडिसचा झेल घेतला.
त्यानंतर श्रीलंकेने 162 धावांवर 7 विकेट्स गमावल्यानंतर महिश तिक्षणा खेळपट्टीवर स्थिरावलेल्या दुनिल वेलालागेला साथ देण्यासाठी उतरला होता. तो त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ देत होता. त्यामुळे एका बाजूने वेलालागे श्रीलंकेला पुढे नेत होता. पण याचदरम्यान 41 व्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला.
हार्दिकने 41 व्या षटकात टाकलेल्या 5 व्या चेंडूवर तिक्षणाने फटका खेळला, त्याने गॅपमध्ये चेंडू मारला होता. पण याचवेळी मिडऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सूर्यकुमार यादवने उजवीकडे येत जमिनीलगत झेल घेतला. त्यामुळे तिक्षणा 14 चेंडूत 2 धावांवर बाद झाला.
त्यामुळे त्याच्या पुढच्याच षटकात कुलदीप यादवने श्रीलंकेचे अखेरचे दोन्ही विकेट्स घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, सूर्यकुमारने तिक्षणाचा घेतलेला झेल महत्त्वाचा ठरला, कारण तो फार धावा करत नसला, तरी खेळपट्टीवर टिकून वेलालागेला साथ देत होता. ही गोष्ट भारतासाठी धोकादायक ठरू शकली असती. विशेष म्हणजे सूर्यकुमारला या सामन्यानंतर या झेलासाठी सर्वोत्तम झेलाचा पुरस्कारही देण्यात आला.
सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव 49.1 षटकात 213 धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 53 धावांची खेळी केली होती. तसेच श्रीलंकेकडून वेलालागेनेच सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
तसेच नंतर 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 41.3 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून फलंदाजीवेळीही वेलालागेने सर्वाधिक 42 धावांनी नाबाद खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.