South Africa vs India, 2nd Test at Cape Town:
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर पार पडला. गुरुवारी (4 जानेवारी) या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला.
दरम्यान या सामन्याची नोंद क्रिकेट इतिहासात झाली आहे, कारण हा चेंडूंच्या तुलनेतील सर्वात लहान कसोटी सामना ठरला आहे.
हा सामना अवघ्या 642 चेंडूंचाच झाला. त्यामुळे हा पूर्ण झालेल्या कसोटी सामन्यांपैकी हा सर्वात छोटा सामना ठरला.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 1932 साली मेलबर्नला झालेला सामना पूर्ण झाला सर्वात लहान कसोटी सामना होता. हा सामना 656 चेंडूत पूर्ण झाला होता.
642 चेंडू - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024
656 चेंडू - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, 1932
672 चेंडू - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, 1935
788 चेंडू - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, 1888
792 चेंडू - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1888
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 79 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 12 षटकात 3 विकेट्स गमावत 80 धावा करून पूर्ण केले. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 36.5 षटकात 176 धावांवर संपला होता. पण पहिल्या डावातील 98 धावांच्या पिछाडीमुळे भारतासमोर 79 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला ठेवता आले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात 23.2 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच भारतीय संघही पहिल्या डावात 34.5 षटकात 153 धावांवर सर्वबाद झाला होता.
दरम्यान, भारतीय संघ केपटाऊनमध्ये कसोटीत विजय मिळवणारा पहिला आशियाई संघ ठरला.
या सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.