Shahid Afridi on India vs Pakistan Cricket: भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत. त्यामुळे या दोन देशांमधील क्रिकेटबद्दल सातत्याने चर्चा होत असते. आता याबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही मोठी प्रतिक्रिया दिली असून त्याने असेही म्हटले आहे की तो दोन्ही देशांमधील क्रिकेटसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणार आहे.
दोहामध्ये होत असलेल्या लिजेंड लीग क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारत - पाकिस्तान क्रिकेटबद्दल बोलताना शाहीद आफ्रिदी म्हणाला, 'मी मोदी साहेबांना विनंती करणार आहे की दोन्ही देशांमध्ये क्रिकेट होऊ द्या.'
तो म्हणाला, 'जर आपण एखाद्याशी मैत्रीचा हात पुढे करत असू आणि तो आपल्याशी बोलायलाही तयार नसेल, तर आपण काय करू शकतो. यात काहीही शंका नाही, की बीसीसीआय एक मजबूक क्रिकेट बोर्ड आहे. पण जेव्हा तुम्ही मजबूत असता, तेव्हा तुमच्याकडे अधिक जबाबदारी असते. तुम्ही आणखी शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्हाला मित्र कमावण्याची गरज असते. तुम्ही जेव्हा मित्र कमावता, तेव्हा तुम्ही आणखी मजबूत होता.'
आफ्रिदीला तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कमजोर मानतो का असे विचारल्यावर तो म्हणाला, 'मी कमजोर असे म्हणणार नाही, पण काही उत्तरे समोरून देखील यायला हवीत.'
याबरोबरच आफ्रिदी म्हणाला, 'माझे अजूनही भारतीय संघातील मित्र आहेत. आम्ही जेव्हाही भेटतो, तेव्हा चर्चा करतो. एकदा मी रैनाला भेटलो होतो, मी त्याच्याकडे बॅट मागितली आणि त्याने मला बॅट दिली.'
आफ्रिदी सुरक्षेबद्दल म्हणाला, 'जोपर्यंत पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न आहे, तर तो आहे. पण नजीकच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानात येऊन गेले आहेत. आम्हालाही भारतातून सुरक्षेच्याबाबतीत धमक्या यायच्या. पण जर दोन्ही देशांच्या सरकारकडून परवानगी मिळाली असेल, तर दौरा व्हायचा. जर दौरा झाला नाही, तर आपण त्या लोकांनाच संधी देत आहोत, ज्यांना या दोन्ही देशात क्रिकेट नको आहे.'
दरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये 2012-13 नंतर राजकिय तणावामुळे द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत. हे दोन संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये आणि आशिया चषकात आमने-सामने येत असतात.
तसेच गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात आगामी आशिया चषक खेळवायचा की नाही, यावर चर्चा सुरू आहे. आशिया चषक 2023 चे आयोजक पाकिस्तान आहे. पण भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणाने पाकिस्तानातून हा आशिया चषक हलवला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल अंतिम निर्णय होणे बाकी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.