Sachin Tendulkar Meet Afghanistan Team ahead of Australia match at Wankhede Stadium in ICC ODI Cricket World Cup 2023:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना होत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाची मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भेट घेतली. ज्याबद्दल सध्या त्याचे खूप कौतुक होत आहे.
सचिन तेंडुलकर हा वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा ब्रँडअँबेसिडर आहे. त्याने वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. याबरोबरच त्यांच्याबरोबर फोटोही काढले. यावेळी अफगाणिस्तानच्या खेळाडूंबरोबर त्यांचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट आणि मार्गदर्शक अजय जडेजा देखील होते. या क्षणांचा व्हिडिओ आणि फोटोही आयसीसीने शेअर केला आहे.
आयसीसीने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसते की सचिनने अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबीला स्मृतीचिन्हही दिले.
तसेच सचिनला भेटण्याबद्दल राशीद खान म्हणाला, 'आमच्यातल्या प्रत्येकासाठी हा खूप खास क्षण होता. वानखेडे स्टेडियमवर त्याला भेटणे खूप विशेष क्षण होता. मला वाटते की ही खूप वेगळी भावना आहे. नक्कीच खेळाडूंमध्ये आणि संघात सकारात्मक उर्जा निर्माण झाली आहे.'
त्याचबरोबर राशीद म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी सचिनला भेटणे जास्त विशेष होते. तो म्हणाला, 'मी त्याला इथे येण्याबद्दल धन्यवाद म्हणतो. मला माहित आहे त्याला पाहूनच अनेकांनी क्रिकेट पाहायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमध्येही तो सर्वांसाठी आदर्श आहे.'
'त्यामुळे संपूर्ण अफगाणिस्तानकडून इथे आल्याबद्दल आणि आमच्याबरोबर वेळ घालवल्याबद्दल आभार व्यक्त करतो. मला माहित आहे, यामुळे संघाला खूप उर्जा मिळाले असेल. त्याला भेटणे सर्वांसाठी एक स्वप्न होते.'
दरम्यान, सचिनने अफगाणिस्तानची भेट घेतल्याबद्दल अनेक चाहत्यांकडून त्याचे कौतुकही होत आहे.
वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी 7 सामन्यांमधील 4 सामन्यांत विजय मिळवले आहेत. त्यामुळे जर त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यांत विजय मिळवले, तर ते थेट उपांत्य फेरीतही प्रवेश करू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.