Rajeev Shukla to STEP DOWN: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शुक्ला यांची संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेसाठी खासदार म्हणून निवड झाली आहे. सहा वर्षांच्या कार्यकाळाला सुरुवात करुन त्यांनी सोमवारी शपथ घेतली.
दरम्यान, बीसीसीआयच्या (BCCI) मंजूर झालेल्या घटनेनुसार कोणताही लोकसेवक एकाच वेळी दोन पदे भूषवू शकत नाही. गुरुवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची नुकतीच छत्तीसगडमधून (Chhattisgarh) राज्यसभा खासदार (MP) म्हणून निवड झाली आहे. काँग्रेसचे (Congress) उमेदवार शुक्ला यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “घटनेनुसार शुक्लाजींना पद सोडावे लागेल. बहुतांश पदाधिकारी इंग्लंडमध्ये असल्यामुळे आम्हाला त्यावर चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. शुक्लाजीही त्यांच्या राज्यसभेतील वचनबद्धतेत व्यस्त होते. सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्याची संधी मिळेल. परंतु ते कधी जाहीर करणार हे सांगता येत नाही.''
बीसीसीआयची घटना काय सांगते?
नियम 7.2 नुसार, 'अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष काम पाहतील'. अध्यक्षांची अशी कार्ये आणि कर्तव्ये पार पाडतील जी त्यांना जनरल बॉडी किंवा सर्वोच्च परिषदेने अधिकार दिले असतील.'
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार यांची बीसीसीआयचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने लोकसेवक म्हणून कोणतीही भूमिका बजावल्यास त्यांना बीसीसीआयचा अधिकारी म्हणून पदावर राहता येत नाही. राजकारण्यांना बीसीसीआयमध्ये पदे स्वीकारण्यापासून रोखण्यासाठी हे विशेषतः तयार करण्यात आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.