क्रीडा

पणजी फुटबॉलर्सच्या पदाधिकाऱ्यांवर ठपका

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील 2019-20 मोसमात संशयास्पद (रेड श्रेणी) सामन्यांबाबत जीएफए नैतिकता समितीने अहवाल सादर केला, त्यात त्यांनी पणजी फुटबॉलर्सच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आणि स्पोर्टिंग क्लब द गोवा व पणजी फुटबॉलर्स यांच्यातील सामना निकालही रद्द करण्याचा आदेश दिला, तसेच त्या मोसमातील संयुक्त विजेतेपदाचा निर्णयही रद्दबातल ठरविला.

संबंधितांवरील कारवाईसंदर्भात जीएफएने आदेशाचे पालन करण्याचे निर्देश नैतिकता समितीने दिले आहेत. समितीने 10 जून 2022 या तारखेने आदेश जारी केला आहे. जीएफए नैतिकता आचारसंहिता 2021 नुसार 13, 15, 18 आणि 19(2) कलमाचे उल्लंघन संबंधितांनी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

संघ व्यवस्थापक वाझ यांचे निलंबन

प्रोफेशनल लीगच्या 2019-20 मोसमातील पणजी फुटबॉलर्सचे व्यवस्थापक अँथनी वाझ यांना जीएफए आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) फुटबॉलविषयक उपक्रमांतून तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय नैतिकता समितीने दिला. आदेशाच्या तारखेपासून महिनाभरात वाझ यांना दहा हजार रुपये दंडही जीएफएकडे भरावा लागेल. वाझ यांना खेळाडू आणि संघ अधिकारी यांच्या देय रकमेचा जमाखर्च जीएफए कार्यालयात सादर करण्यास बजावले आहे, तोपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहील.

तर क्लबवरही कारवाई

खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांच्या देय रकमेबाबत आदेश दिलेल्या तारखेपासून एका महिन्याच्या आत जमाखर्च जीएफए कार्यालयास सादर करण्यास असमर्थ ठरल्यास पणजी फुटबॉलर्स क्लब आदेशाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जीएफए व एआयएफएफच्या सर्व फुटबॉल उपक्रमांतून निलंबित असेल.

आल्बुकर्कना ताकीद

जीएफए नैतिकता समितीने आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी आग्नेल आल्बुकर्क यांना एकमताने दोषी धरले आहे. लीग स्पर्धेत अधिकारी या नात्याने आल्बुकर्क यांना दोन समांतर क्लबचे प्रतिनिधित्व करण्याबाबत ताकीद देणारे पत्र जीएफएने त्यांना पाठवावे असा आदेश नैतिकता समितीने दिला आहे. आदेशाचे पालन केले नाही, तर आल्बुकर्क यांना निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पणजी फुटबॉलर्स-स्पोर्टिंग सामना रद्द

प्रोफेशनल लीगच्या 2019-20 मोसमातील पणजी फुटबॉलर्स आणि स्पोर्टिंग क्लब द गोवा या संघांतील साखळी सामन्याचा निकाल रद्द करण्याचा निर्णय नैतिकता समितीने दिला आहे. सामन्यात परस्पर हितसंबंधांचे गंभीरपणे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले. स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ अव्वल स्थानी यावा या उद्देशाने स्पर्धेतील 44 क्रमांकाच्या सामन्याचा निकाल निश्चित करण्यात आल्याचे गृहित धरले आहे. त्यामुळे अंतिम गुणतक्त्यातील स्पोर्टिंग क्लबचे तीन गुण आणि तीन गोल काढून घेण्याचा आदेशही देण्यात आला.

संयुक्त विजेते नाहीत

कोविडमुळे 2019-20 मोसमातील 13 सामने बाकी असताना प्रोफेशनल लीग स्पर्धा स्थगित करावी लागली. स्पर्धेतील सामने बाकी असताना जीएफए आणि कार्यकारी समिती संयुक्त विजेते जाहीर करण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत घेऊ शकत नाही. अर्धवट लीग रद्द करण्यात झाल्यानंतर घेतलेला संयुक्त विजेतेपदाचा निर्णय अनैतिक असल्याचे नैतिकता समितीने नमूद केले. 2019-20 मोसमातील गुणतक्त्याचे पुनरावलोकन आणि पुनर्बांधणी करण्याचा आदेश नैतिकता समितीने जीएफएला दिला आहे.

स्पोर्टिंग क्लब अपिल करणार

जीएफए नैतिकता समितीचा आदेश शनिवारी मिळाल्यानंतर त्याविरोधात अपिल करण्याचे स्पोआदेर्टिंग क्लब द गोवा संघाने ठरविले आहे. हा आदेश बाजूला ठेवावा या हेतूने ते दाद मागणार आहेत. यासंबंधी माहिती क्लबचे संचालक डायगो नॅथन वाझ यांनी दिली. स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने कधीच कोणत्याच प्रकारच्या सामना निकाल निश्चितीस प्रोत्साहन दिले नाही अथवा भाग घेतला नाही, असे वाझ यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

Tiswadi Agriculture : नेवरा खाजन शेतजमिनीत पुन्हा नदीचे खारे पाणी; शेतीला चालना देण्याचे पोकळ दावे

आपण नागरिक म्हणून मतदान करणार का ?

शिरगावच्या जत्रेत प्रगटलेली क्रांतिज्योत

बारावंश

SCROLL FOR NEXT