पंजाबमधील मोहाली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचा सराव सुरू असताना चेंडू शेजारील स्विमिंग पूलमध्ये गेल्याच्या किरकोळ कारणावरून २२ वर्षीय क्रिकेटपटूवर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खेळाडूच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सात्विक अमन असे जखमी क्रिकेटपटूचे नाव असून तो मूळचा बिहारमधील औरंगाबादचा रहिवासी आहे. मोहालीतील सेक्टर ७४ ए येथील ओम साई क्रिकेट अकादमीमध्ये तो सराव करत होता. याचदरम्यान ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून क्रिकेटच्या मैदानावर सराव करणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात्विक अमन हा मोहालीतील ओम साई क्रिकेट अकादमीमध्ये नियमितपणे क्रिकेटचा सराव करत होता. सरावादरम्यान त्याने मारलेला चेंडू मैदानाची सीमारेषा ओलांडून जवळच असलेल्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडला. त्यामुळे चेंडू परत आणण्यासाठी सात्विक पूलच्या ठिकाणी गेला. मात्र, त्यावेळी स्विमिंग पूलचे प्रवेशद्वार बंद होते.
काही वेळाने पूलचा मालक जसबीर सिंह बाहेर आला. त्याने सात्विकला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सात्विकने केवळ आपला चेंडू परत देण्याची विनंती केली होती. मात्र, याच गोष्टीवरून दोघांमध्ये वाद वाढला. आरोपानुसार, जसबीरने सात्विकच्या कपाळावर जोरात ठोसा मारला. त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली.
वाद सुरू असतानाच जसबीर सिंह घरात किंवा परिसरातील आतल्या भागात गेला आणि हातात तलवार (कृपाण) घेऊन परत आला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सात्विक घाबरला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने जवळ पडलेली बांबूची काठी हातात घेतली. मात्र, आरोपीने त्याच्यावर तलवारीने वार केला. या हल्ल्यात सात्विकच्या डोक्याला दुखापत झाली.
तलवारीचा वार रोखण्यासाठी सात्विकने डावा हात पुढे केला. यावेळी तलवार त्याच्या हातावर लागल्याने हाताला गंभीर जखम झाली. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही. सात्विकने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पाठीवर पुन्हा दोन वेळा वार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेमुळे सात्विकला गंभीर दुखापत झाली.
हल्ल्यानंतर जखमी सात्विकने तातडीने आपला भाऊ साकेत याला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच साकेत घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर त्याने सात्विकला मोहालीतील फेज ४ परिसरातील चीमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर सात्विकने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सात्विकच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जसबीर सिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा बलियाली गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१) अंतर्गत धोकादायक शस्त्राचा वापर करून जाणीवपूर्वक दुखापत केल्याचा, तर कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हेगारी धमकी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, क्रिकेटच्या सरावादरम्यान घडलेल्या एका किरकोळ घटनेतून थेट तलवारीने हल्ला करण्यापर्यंत वाद पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.