Lionel Messi dedicate his 8th Ballon d'Or award to Diego Maradona:
पॅरिसला सोमवारी (30 ऑक्टोबर) 67 वा बॅलन डी'ओर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला. विक्रमी आठव्यांदा त्याच्या नावाची मोहोर या पुरस्कारावर उमटली आहे.
दरम्यान, हा पुरस्कार जिंकल्यानंतर मेस्सीने हा पुरस्कार दिग्गज दिएगो मॅराडोना यांनाही समर्पित करत अनेकांचे मन जिंकले.
गेल्यावर्षी हा पुरस्कार करिम बेंझेमाला मिळाला होता, पण त्यानंतर पुन्हा ३६ वर्षीय मेस्सीने हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. मेस्सीव्यतिरिक्त आत्तापर्यंत कोणालाही ८ वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकता आलेला नाही. त्याच्यानंतर 5 वेळा ख्रिस्तियानो रोनाल्डोने हा पुरस्कार जिंकला आहे.
मेस्सीने त्याच्या नेतृत्वाखाली डिसेंबर 2022 मध्ये अर्जेंटिनाला 36 वर्षांनी वर्ल्डकपही जिंकून दिला होता. त्या स्पर्धेतीलही तो सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
दरम्यान, मेस्सीने बॅलन डी'ओर 2023 स्पर्धा जिंकल्यानंतर म्हटले की 'मी यापूर्वी जेव्हा जिंकले होतो, तेव्हा अर्जेंटिनाने कोपा अमेरिका (2021) जिंकली होती. पण यावेळीचा पुरस्कार खूप खास आहे कारण तो आम्ही वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिळाला आहे.'
'वर्ल्डकप अशी ट्रॉफी आहे, जी जिंकण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि माझ्यासाठी, माझ्या संघसहकाऱ्यांसाठी आणि देशासाठी ते स्वप्न पूर्ण झाले आहे.'
तसेच मेस्सीने स्वर्गवासी मॅराडोना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हा पुरस्कार त्यांच्यासाठीही असल्याचे सांगितले. 30 ऑक्टोबरला मॅराडोना यांचा 63 वा वाढदिवस होता. मॅराडोना यांचे 25 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले आहे.
मेस्सी म्हणाला, 'तू जिथे कुठे आहेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिएगो! ही ट्रॉफी तुझ्यासाठीही आहे.'
दरम्यान, मेस्सीने एर्लिंग हालंडला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. मतदानात नॉर्वेचा हालंड दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तसेच कायलिन एमबाप्पे तिसऱ्या क्रमांकावर आणि केविन डी ब्रुयेन चौथ्या क्रमांकावर राहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.