KL Rahul React on Virat Kohli Century during India vs Bangladesh ICC ODI Cricket World Cup 2023:
गुरुवारी (19 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर पार पडलेल्या या सामन्यात विराट कोहलीने शतक करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, त्याचे शतक पूर्ण होण्यात केएल राहुलचेही महत्त्वाचे योगदान राहिले.
विराटने 42 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. तो हा चेंडू खेळण्यापूर्वी 97 धावांवर होता. त्यामुळे त्याने षटकाराबरोबरच भारताचा विजय आणि त्याचे शतकही निश्चित केले.
तथापी विराटने त्याचे हे शतक पूर्ण करावे म्हणून केएल राहुने काही एकेरी धावा काढण्यास नकार दिला होता. याबद्दल केएल राहुलने सामन्यानंतर खुलासा केला आहे. केएल राहुलने सांगितले की त्याने विराटला शतक पूर्ण करण्यासाठी सांगितले.
केएल राहुलने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की 'विराट गोंधळलेला होता, तो म्हणाला एकेरी धाव न घेणे चांगले दिसणार नाही. हा वर्ल्डकप आहे, मोठी स्पर्धा आहे. मी वैयक्तिक माईलस्टोनसाठी खेळतोय, असं वाटायला नको. पण मग मी त्याला सांगितले, मला वाटतं आपण आता सहज जिंकू, तेव्हा तू जर एखादा माईलस्टोन पार करणार असशील, तर तुला प्रयत्न करायला हवे. आणि त्याने शेवटी ते केलेच. मी तसंही एकेरी धाव काढणार नव्हतो.'
विराट आणि केएल राहुल फलंदाजी करत असताना त्यांनी साधारण ५ वेळा एकेरी धाव काढण्याची संधी असूनही ती दवडली होती. 38 व्या षटकात भारतीय संघ 3 बाद 229 धावांवर होता. तसेच भारताला विजयासाठी केवळ 28 धावांची गरज होती. त्यावेळी विराट 73 धावांवर होता.
त्यानंतर 39 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर विराट आणि राहुलने एक-एक धाव काढली. त्यानंतर भारताला विजयासाठी आणि विराटला शतकासाठी 26 धावांची गरज होती.
त्यानंतर विराटने 40 व्या षटकात 11 धावा काढल्या. यादरम्यान, त्यांनी केएल राहुलने एकेरी धावा काढण्यासाठी नकार दिला होता.
दरम्यान, 41 व्या षटकानंतर भारताला 54 चेंडूत विजयासाठी केवळ 2 धावांची गरज होती आणि विराट 97 धावांवर खेळत होता. त्यानंतर या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव काढली नाही, पण तिसऱ्या चेंडूवर विराटने षटकार ठोकला आणि भारताला विजयी केले.
दरम्यान, त्याच्या खेळीबद्दल विराट म्हणाला, 'मला मोठे योगदान द्यायचे होते. मी वर्ल्डकपमध्ये काही अर्धशतके केली होती. पण मी त्यांचे रुपांतर मोठ्या खेळीत करू शकलो नव्हतो. त्यामुळे यावेळी मला सामना संपवायचा होता. सामन्याच्या शेवटपर्यंत टीकून राहाणे, हेच मी इतके वर्षे संघासाठी करत आलो आहे.'
या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर २५७ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 41.3 षटकात 3 बाद 261 धावा करत पूर्ण केले. या सामन्यात विराटने 97 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.
तसेच केएल राहुल 34 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनीही सलामीला 88 धावांची भागीदारी चांगली सुरुवात दिली होती. गिलने ५३ धावांची खेळी केली, तर रोहितने 48 धावा केल्या.
तत्पूर्वी, बांगलादेशने तान्झिद हसन (51) आणि लिटन दास (66) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या होत्या. भारताकडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.