पणजी: केरळा ब्लास्टर्सने धडाधड तीन गोल केल्यामुळे एफसी गोवाच्या पदरी रविवारी रात्री निराशा पडली. इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत कोचीतील घरच्या मैदानावर पाठीराख्यांच्या उत्स्फूर्त प्रोत्साहनाच्या बळावर केरळमधील संघाने 3-1 अशी बाजी मारली.
(Kerala Blasters defeated FC Goa in the Indian Super League football tournament)
केरळा ब्लास्टर्ससाठी हा विजय संस्मरणीय ठरला. कारण- सहा वर्षे आणि दहा सामन्यानंतर त्यांनी एफसी गोवास आयएसएल स्पर्धेत पराजित करण्याची किमया साधली. यापूर्वी 2016 साली त्यांनी गोव्यातील संघाला शेवटच्या वेळेस हरविले होते. केरळा ब्लास्टर्सचा यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसरा, तर एकंदरीत तिसरा विजय साकारताना उरुग्वेच्या ॲड्रियन लुना याने 42 व्या मिनिटास पहिला गोल केला.
नंतर 45 +1 व्या मिनिटास ग्रीक खेळाडू दिमित्रिओस दियामांताकोस याने पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधला, तर 52 व्या मिनिटास युक्रेनच्या इव्हान कालियूझ्नी याने अप्रतिम गोलवर केरळा ब्लास्टर्सची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. त्याने जवळपास 30 यार्डावरून हाणलेल्या ताकदवान फटक्यासमोर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम हतबल ठरला. मोरोक्कन नोआ सदावी याने भेदक हेडिंग साधत एफसी गोवाची पिछाडी 67 व्या मिनिटास कमी केली.
समान नऊ गुण
एफसी गोवास दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. आता त्यांचे आणि केरळा ब्लास्टर्सचे समान नऊ गुण झाले आहेत. मात्र सरस गोलसरासरीमुळे एफसी गोवा (+3) चौथ्या, तर केरळा ब्लास्टर्स (+1) पाचव्या स्थानी आहे. एफसी गोवाचा पुढील सामना फातोर्ड्यात येत्या 20 नोव्हेंबरला एटीके मोहन बागानविरुद्ध होईल. केरळा ब्लास्टर्स प्रवास करणार असून हैदराबाद एफसीविरुद्ध त्यांची लढत 19 नोव्हेंबरला होईल.
भीती खरी ठरली
केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा सामना खूपच कठीण असेल ही एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी सामन्यापूर्वी व्यक्त केलेली भीती खरी ठरली. गोव्यातील संघाने धारदार आक्रमक खेळ केला, पण त्यांनी बचावात चुका केल्या व त्याचा फायदा केरळा ब्लास्टर्सने उठविला. विश्रांतीपूर्वीच दोन गोल स्वीकारल्यानंतर एफसी गोवास नंतर डोकेवर काढणे अवघड ठरले. गोलरक्षक प्रभसुखन गिल दक्ष ठरला. एफसी गोवाने काही संधी निर्माण केल्या, परंतु केरळा ब्लास्टर्सचा बचाव दक्ष राहिला. अपवाद फक्त सदावीच्या भेदक हेडरचा ठरला.
आकडेवारीत सामना
उभय संघांतील 17 लढतीत केरळा ब्लास्टर्सचे 4 विजय, अन्य 9 लढतीत एफसी गोवा विजयी, 4 बरोबरी
एफसी गोवाविरुद्ध सलग 3 बरोबरी आणि 10 लढतीनंतर केरळा ब्लास्टर्सला पूर्ण तीन गुण
केरळमधील संघाचा गोव्यातील संघावर शेवटचा विजय (2-1) 13 नोव्हेंबर 2016 रोजी
केरळा ब्लास्टर्स व एफसी गोवा यांच्यातील आयएसएल लढतींत आता एकूण 67 गोल
एफसी गोवाचे आता 5 सामन्यांत 3 विजय, 2 पराभवांमुळे 9 गुण
केरळा ब्लास्टर्सचे 6 लढतीतून 3 विजय व 3 पराभवांमुळे 9 गुण
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.