भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि हार्दिक पंड्या सध्या विविध कारणांनी चर्चेत येत आहेत. इशान किशन काही चुकीच्या गोष्टींमुळेही चर्चेत आहे. त्यातच आता हार्दिकनंतर त्यानेही बीसीसीआयचा एक मोठा नियम मोडल्याचे दिसून आले आहे.
हे दोघेही सध्या डी वाय पाटील टी20 स्पर्धेत खेळत आहेत. पण या स्पर्धेत रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून खेळणारा इशान जेव्हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याने जे हेल्मेट घातले होते, त्यावर भारताचा तिरंगा आणि बीसीसीआयचा लोगो स्पष्ट दिसत होता.
याशिवाय हार्दिक पंड्यानेही या स्पर्धेत पहिला सामना खेळल्यानंतर त्याचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्येही हार्दिकने बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट घातल्याचे दिसत आहे.
आता याच गोष्टीमुळे हार्दिक आणि इशान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बीसीसीआयच्या नियमानुसार देशांतर्गत किंवा स्थानिक स्पर्धांमध्ये खेळताना खेळाडूंना बीसीसीआयचा लोगो त्यांच्या कोणत्याही साधनांवर वापरण्याची परवानगी नाही.
असे आढळल्यास त्या खेळाडूवर कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, अशावेळी बऱ्याचदा पंचांकडून खेळाडूंना आधी चेतावणी दिली जाते. मात्र अद्याप तरी इशान किंवा हार्दिकवर यासंदर्भात कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे याच स्पर्धेत तिलक वर्मा देखील खेळत आहे. पण जेव्हा त्याने फलंदाजी केली, तेव्हा त्याने त्याच्या हेल्मेटवरील बीसीसीआयचा लोगो टेपने झाकला होता.
हार्दिकला 2023 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान खेळताना पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो जवळपास 3 महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याने नुकतेच डी वाय पाटील टी20 स्पर्धेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
दरम्यान, इशानसाछी मात्र गेल्या काही दिवसात चांगली बातमी आलेली नाही. बीसीसीआयने त्याला 2023-24 दरम्यानच्या करारातून बाहेर केले आहे. यामागील कारण बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. मात्र अनेक रिपोर्टनुसार इशानला झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास सांगण्यात आले होते.
मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आता तो डी वाय पाटील टी20 स्पर्धेत खेळत आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्याविरुद्ध शिस्तभंगामुळे त्याला करारात स्थान न दिल्याचे म्हटले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.