India Squad for South Africa tour:
भारतीय क्रिकेट संघ डिसेंबर 2023 महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 वनडे सामने, 3 टी20 सामने आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, या तिन्ही संघात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वनडे वर्ल्डकपनंतर होणाऱ्या पहिल्याच परदेशी दौऱ्यात भारतीय संघात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. कसोटी संघात महत्त्वाचे बदल झालेले दिसत आहेत.
यात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, मुकेश कुमार अशा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंना संधी मिळालेली नाही, त्यामुळे आता या दोघांचे भारतीय संघातील भवितव्य संपुष्टात आल्याची चर्चा होत आहे.
सध्या कसोटी चॅम्पियनशीचे तिसरे पर्व काही महिन्यांपूर्वीच सुरु झाले आहे. त्यामुळे या नव्या पर्वात निवड समिती नव्याने संघबांधणी करत असल्याचेही अनेक चाहत्यांनी अंदाज बांधले आहेत.
दरम्यान, रहाणे आणि पुजारा यांना संघाबाहेर ठेवण्याचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही, विशेष म्हणजे रहाणे वर्ल्डकप 2023 पूर्वी झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेत उपकर्णधार होता. पण त्याला या मालिकेत 11 धावाच करता आल्या होत्या. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर करण्यात आले आहेत.
दरम्यान, रहाणे जून 2023 पूर्वीही दीड वर्षे भारतीय संघातून बाहेर होता. पण त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले होते. त्याने जूनमध्ये कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामनाही खेळला होता.
मात्र, नंतर रहाणेची कामगिरी घसरली, तसेच आता रहाणेने वयाची पस्तीशीही ओलांडली आहे. त्यामुळे आता त्याचे पुन्हा भारतीय संघातील पुनरागमन कठीण मानले जात आहे.
पुजाराही कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामना खेळला. मात्र, त्यात त्याला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. तसेच गेल्या वर्षभरातही त्याला फार काही करता आले नव्हते. त्याने 2023 वर्षात 5 सामन्यांत 25.85 च्या सरासरीने 181 धावा केल्या आहेत.
दरम्यान, पुजाराने एक कसोटीपटू म्हणून त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याची खालावलेली कामगिरी आणि त्याचे वय पाहाता, त्याला आता पुढे संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.
रहाणेने कसोटीत 85 सामने खेळले असून 38.46 सरासरीने 5077 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत.
पुजाराने 103 कसोटी सामने खेळले असून 43.60 सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षरक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.