Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मुंबईचा सलग तिसरा विजय! हैदराबाद सलग दोन विजयानंतर घरच्या मैदानात पराभूत

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना झाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 14 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद समोर 193 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ 19.5 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान हा मुंबई इंडियन्सचा या हंगामातील सलग तिसरा विजय ठरला आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डावाची सुरुवात हॅरी ब्रुक आणि मंयक अगरवाल यांनी केली. मात्र, ब्रुक दुसऱ्याच षटकात जेसन बेऱ्हेनडॉर्फविरुद्ध खेळताना 9 धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीही 7 धावांवर बेऱ्हेनडॉर्फच्या गोलंदाजीवरच बाद झाला.

यानंतर मयंक आणि कर्णधार एडन मार्करमने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांची भागीदारी रंगतही होती. पण 46 धावांची भागीदारी झाली असताना मार्करमला कॅमेरॉन ग्रीनने 8 व्या षटकात बाद केले. मार्करमने 17 चेंडूत 22 धावांची खेळी केली. त्याच्या पुढच्यात षटकात अभिषेक शर्माही 1 धाव करून बाद झाला.

त्यानंतर हेन्रिक क्लासेनने आक्रमक खेळत हैदराबादच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण धोकादायक वाटत असलेल्या क्लासेनला पीयुष चावलाने 14 व्या षटकात माघारी धाडले. क्लासेनने 16 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर पुढच्याच षटकात एक बाजू सांभाळणारा मयंक अगरवालला रिली मॅरेडिथने बाद केले. मयंकने 41 चेंडूत 48 धावांची खेळी केली.

अखेरची षटके बाकी असताना मार्को यान्सिनने 3 चौकार मारत त्याचे कौशल्य दाखवले होते. मात्र तोही 13 धावांवर बाद झाला. दरम्यान, समद धीम्या गतीने खेळ केला. त्याच्याबरोबर यान्सिननंतर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेही दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली होती. पण तो 10 धावांवर असताना 18 व्या षटकाच्या अखेरीस धावबाद झाला. त्याला टीम डेव्हिडने डायरेक्ट थ्रो करत बाद केले.

यानंतर कॅमेरॉन ग्रीनने 19 व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या. त्यामुळे हैदराबादला अखेरच्या षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. या षटकात गोलंदाजीची जबाबदारी रोहितने अर्जुनला दिली. अर्जुनने या षटकात चांगली गोलंदाजी केली. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अब्दुल सामद 12 चेंडूत 9 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर अर्जुनने पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला 2 धावांवर बाद करत पहिली आयपीएल विकेट गमावली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने विजयही मिळवला.

मुंबईकडून जेसन बेऱ्हेनडॉर्फ, रिली मॅरिडिथ आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्जुन तेंडुलकर आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी या सामन्यात हैदराबादचा कर्णधार मार्करमने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनसह डावाची सुरुवात केली. या दोघांनी चांगली सुरुवातही दिली. ते सुरुवातीपासूनच जवळपास 10 ची धावगती ठेवून खेळत होते. मात्र, पाचव्या षटकात टी नटराजनने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर रोहितने शॉट खेळताना मार्करमच्या हातात सोपा झेल दिला. त्यामुळे रोहितला 28 धावांवर बाद व्हावे लागले.

त्यानंतर ईशानला कॅमेरॉन ग्रीनने चांगली साथ दिली होती. त्यांची भागीदारीही चांगली रंगत होती. मात्र, 12 व्या षटकात मार्को यान्सिनने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ईशानला चूक करण्यात भाग पाडले. ईशानचा झेल मार्करमने मिड-ऑफपासून मागे पळत जात घेतला.

ईशान 38 धावांवर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. मात्र, तो 12 व्या षटकातीलच पाचव्या चेंडूवर बाद झाला. विशेष म्हणजे त्याचाही झेल मिड-ऑफला मार्करमनेच हवेत सूर मारत झेल घेतला. त्यामुळे सूर्यकुमार 7 धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर तिलक वर्माने ग्रीनला चांगली साथ देताना 56 धावांची भागीदारी केली. पण तिलक 17 व्या षटकात 37 धावा करून बाद झाला. नंतर ग्रीन आणि टीम डेव्हिडने डाव पुढे नेला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हिड 16 धावांवर धावबाद झाला. पण ग्रीन 40 चेंडूत 64 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे मुंबईने 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबादकडून मार्को यान्सिनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT