Indian Wrestlers at Jantar Mantar: भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांच्याविरुद्ध आंदोलन केले आहे. त्यांनी ब्रीजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या बंजरंग पुनिया, साक्षी मलिक तसेच विश्व चॅम्पियन विनेश फोगट यांचाही समावेश आहे.
भारतीय कुस्तीपटूंनी आरोप केला आहे की नॅशनल कॅम्पमध्ये प्रशिक्षक, तसेच ब्रीजभूषण सिंग यांच्याकडून महिला खेळाडूंचे गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण होत आहे. याबद्दल भारतीय कुस्तीपटूंनी ट्वीट देखील केले आहेत.
या अंदोलानाबद्दल बोलताना विनेशने सांगितले की 'महिला कुस्तीपटूंचे नॅशनल कॅम्पमध्ये प्रशिक्षकांकडून आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंग यांच्याकडून लैंगिक शोषण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नॅशनल कॅम्पमध्ये नियुक्त केलेले प्रशिक्षक महिला खेळाडूंचा लैंगिक छळ करत आहेत. यामध्ये कुस्ती महासंघाचे अध्यक्षही सामील आहेत.'
तसेच तिने पत्रकारांना असेही सांगितले की 'आम्ही उच्च न्यायालय जेव्हा निर्देश देईल, तेव्हा सर्व पुरावे सादर करू. आम्ही पंतप्रधानांकडेही सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहे.' तसेच तिने ब्रीजभूषण सिंग यांच्यावर तिला टोकियो ऑलिम्पिकनंतर मानसिक त्रास देण्याचाही आरोप केला आहे.
तसेच बजरंग पुनियाने सांगितले की 'कुस्तीपटू सध्या सुरु असलेली हुकुमशाही सहन करणार नाहीत. ' तसेच त्याने असेही म्हटले की कुस्ती महासंघाचे मॅनेजमेंट पूर्णपणे बदलले पाहिजे. सध्या भारतीय कुस्ती महासंघात असलेल्या अधिकाऱ्यांना खेळाबद्दल काहीही माहित नाही.
बंजरंगने पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की 'महिला खेळाडू प्रतिष्ठीत कुटुंबातील आहेत. जर आपल्या बहिणी आणि मुली सुरक्षित नसतील, तर आपण त्याचा स्वीकार करू शकत नाही. आमची मागणी आहे की महासंघात बदल घडला पाहिजे.'
साक्षी मलिकने म्हटले आहे की 'संपूर्ण महासंघात बदल घडला पाहिजे, ज्यामुळे भविष्यातील कुस्तीपटू सुरक्षित राहतील. एक नवीन महासंघ अस्तित्वात आले पाहिजे. अगदी खालच्या स्तरातून खाण पसरलेली आहे. आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी देखील बोलू आणि सर्व गोष्टींचा खुलासा करू. यावर चौकशी झाली पाहिजे.'
दरम्यान ब्रीजभूषण सिंग यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण कसे वळण घेणार हे पाहावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.