पणजी: माजी प्रशिक्षक हुआन फेरांडो यांच्या व्यूहरचनेसमोर एफसी गोवास अखेर नमते घ्यावे लागले. नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एटीके मोहन बागानने बुधवारी इंडियन सुपर लीग (indian super league) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सलग दुसरा विजय नोंदविला.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत एटीके मोहन बागानने (ATK Mohan Bagan) एफसी गोवा संघावर 2-1 फरकाने मात केली. गोमंतकीय स्ट्रायकर लिस्टन कुलासो याने 23व्या, तर फिजी देशाचा रॉय कृष्णा याने 56व्या मिनिटास नोंदविलेल्या प्रत्येक एका गोलच्या बळावर एटीके मोहन बागानने गुणतक्त्यात कामगिरीही सुधारली. कृष्णा याने यंदा चार, तर स्पर्धेत एकूण 33 गोल केले आहेत. दोन सामन्यांचे निलंबन संपवून संघात परतलेल्या स्पॅनिश होर्गे ओर्तिझ याने 81व्या मिनिटास एफसी गोवाची पिछाडी एका गोलने कमी केली. त्याचा हा मोसमातील दुसरा गोल ठरला.
एटीके मोहन बागान ‘टॉप फोर’मध्ये
मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडला नमविलेल्या एटीके मोहन बागानने आता फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली गुणतक्त्यात पहिल्या चार संघांत स्थान मिळविले आहे. आठ लढतीतील त्यांचा हा एकंदरीत चौथा विजय ठरला. 14 गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर आले असून पहिल्या क्रमांकावरील मुंबई सिटीपेक्षा दोन, तर दुसऱ्या क्रमांकावरील हैदराबादपेक्षा एक गुण कमी आहे. चार सामने अपराजित राहिल्यानंतर एफसी गोवास पराभवाचा सामना करावा लागला. आठ लढतीतील त्यांचा हा चौथा पराभव ठरला. त्यामुळे आठ गुणांसह डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आठव्या स्थानी कायम राहिला.
लिस्टन भारतीयांत अव्वल
लिस्टन कुलासो याने बुधवारी प्रेक्षणीय गोल नोंदवून आयएसएलच्या आठव्या मोसमात गोल करणाऱ्या भारतीयांत अव्वल क्रमांक मिळविला. या 23 वर्षीय आघाडीपटूचा हा आठ लढतीतील पाचवा गोल ठरला. एकंदरीत आयएसएल स्पर्धेत त्याने नऊ गोल केले आहेत. एफसी गोवाविरुद्ध लिस्टन सामन्याचा मानकरी ठरला. एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून देताना त्याने चेंडूवर ताबा मिळवत दूरवरून सणसणीत फटक्यावर गोलरक्षक धीरज सिंगला पूर्णपणे चकविले. ताकदवान फटका गोलक्षकाच्या डोक्यावरून नेटमध्ये गेला. यावेळी प्रशिक्षक फेरांडोही विस्मयचकीत झाले.
बंगळूरविरुद्ध चेन्नईयीनला संधी
वास्को येथील टिळक मैदानावर गुरुवारी (ता. 30) चेन्नईयीन एफसी व बंगळूर एफसी यांच्यात लढत होईल. बंगळूरचा सध्याचा खराब फॉर्म पाहता चेन्नईच्या संघाला गुणतक्त्यात प्रगती साधण्याची संधी असेल. चेन्नईयीनचे सध्या सात लढतीतून 11 गुण आहेत. बंगळूरने आठ लढतीतून फक्त सहा गुण मिळविले असून ते दहाव्या स्थानी आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.