Team India Dainik Gomantak
क्रीडा

IRE vs IND, 2nd T20I : आयर्लंडच्या बालबर्नीने फोडला घाम, पण भारताने विजय मिळवत मालिकाही घातली खिशात

Ireland vs India, 2nd T20I: भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध दुसरा टी२० सामना जिंकत मालिकेतही विजयी आघाडी घेतली.

Pranali Kodre

India won 2nd T20I against Ireland by 33 runs:

भारत आणि आयर्लंड संघात सध्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. रविवारी (20 ऑगस्ट) या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने 33 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

डब्लिनमधील द व्हिलेज मैदानात झालेल्या या सामन्यात भारताने आयर्लंडसमोर 186 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडला 20 षटकात 8 बाद 152 धावाच करता आल्या. आयर्लंडकडून अँड्र्यु बालबर्नीने 72 धावा करत एकाकी झुंज दिली.

भारताने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडकडून अँड्र्यू बालबर्नी आणि कर्णधार पॉल स्टर्लिंग सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. पण तिसऱ्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने आयर्लंडला दोन झटके दिले. त्याने स्टर्लिंग आणि यष्टीरक्षक फलंदाज लॉर्कन टकर यांना बाद केले. हे दोघेही शुन्यावर बाद झाले.

त्यापाठोपाठ हॅरी टेक्टर (7) आणि कर्टिस कॅम्फर (18) यांना रवी बिश्नोईने स्वस्तात बाद केले. पण त्यानंतर बालबर्नीला जॉर्ज डॉकरेलने साथ देण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये 5 व्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी झाली.

मात्र डॉकरेल 13 धावांवर धावबाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात अँड्र्यू बालबर्नीला अर्शदीप सिंगने बाद केले. बालबर्नीने 51 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 72 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर बॅरी मॅककार्थीही 2 धावांवर बाद झाला.

अखेरीस मार्क एडेयरने आक्रमक फलंदाजी केली. पण तोपर्यंत उशीर झाला. तो अखेरच्या षटकात 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. शेवटी क्रेग यंग 1 धावेवर नाबाद राहिला.

भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई आणि कर्णधार जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी आयर्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, जयस्वालला क्रेग यंगने चौथ्या षटकात 18 धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ 5 व्या षटकात तिलक वर्माला बॅरी मॅककार्थीने 1 धावेवर बाद केले.

त्यानंतर उपकर्णधार ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनने चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने 13 व्या षटकापर्यंत 100 धावांचा टप्पा पार केला होता.

परंतु, सॅमसन 13 व्या षटकात बेंजामिन व्हाईटविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाल्याने त्यांची जोडी तुटली. सॅमसनने 26 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 40 धावा केल्या. त्यानंतर ऋतुराजने रिंकू सिंगबरोबर डाव पुढे नेताना अर्धशतक झळकावले, पण तो अर्धशतकानंतर 16 व्या षटकात बॅरी मॅककार्थीविरुद्ध खेळताना हॅरी टेक्टरकडे झेल देत बाद झाला.

ऋतुराजने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 58 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर रिंकू सिंग आणि शिवम दुबेने डाव सांभाळला. या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. दरम्यान, दोघांनीही अखेरच्या दोन षटकात आक्रमक खेळ केला.

पण, रिंकू अखेरच्या षटकात मार्क एडेयरविरुद्ध मोठा फटका मारताना क्रेग यंगच्या हातून झेलबाद झाला. रिंकूने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा केल्या. तसेच शिवम दुबे 16 चेंडूत 2 षटकारांसह 22 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या.

आयर्लंडकडून बॅरी मॅककार्थीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क एडेयर, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाईच यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT