India Archery Hat-Trick Asian Games 2026: भारतीय क्रीडा विश्वासाठी एशियन गेम्स 2026चा अकरावा दिवस ऐतिहासिक आणि स्वप्नवत ठरला. भारताच्या खेळाडूंनी आज (30 सप्टेंबर) आपल्या दैदीप्यमान कामगिरीच्या बळावर तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधत क्रीडा जगतात नवा इतिहास रचला. महिला आणि मिक्स्ड कंपाउंड संघ प्रकारात भारताने आधीच सुवर्णपदकांवर कब्जा केला, ज्यामुळे पुरुष कंपाउंड संघाकडूनही सुवर्णपदकाची प्रचंड अपेक्षा वाढली होती.
चीनविरुद्ध झालेला हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक ठरला, जिथे चीनच्या एका शेवटच्या चुकीचा पुरेपूर फायदा उठवत भारताने सोनेरी यश आपल्या नावावर केले. भारताच्या (India) साहिल जाधव, कुशाल दलाल आणि गणेश मणि रत्नम थिरुमुरु या सुवर्णविजेत्या त्रिकुटाने हा ऐतिहासिक विजय मिळवत देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली.
पुरुष कंपाउंड संघ प्रकारात अंतिम फेरीत धडक मारण्यापूर्वी भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 236-237 असा रोमहर्षक विजय मिळवून फायनलचे तिकीट कन्फर्म केले होते. अंतिम सामन्यात चीनविरुद्धच्या महामुकाबल्यात भारताची सुरुवात काहीशी संघर्षपूर्ण झाली आणि एक वेळ भारत एक चांगली आघाडी गमावून 178-179 अशा फरकाने पिछाडीवर होता. मात्र, दबावाच्या क्षणी चीनच्या खेळाडूंनी मोठी चूक केली आणि त्यांनी 8 गुणांचा शॉट लगावला. या सुवर्णसंधीचा लाभ घेत भारतीय संघाने कोणतीही चूक न करता आपला खेळ उंचावला आणि अखेर 238-237 अशा फरकाने चीनचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. चीनच्या आर्चरी संघाला केवळ एका गुणाच्या फरकाने पराभवाचे तोंड पाहावे लागले आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
आजचा हा दिवस भारतासाठी केवळ एक नाही तर तब्बल चार ऐतिहासिक सुवर्णपदके घेऊन आला, ज्यामध्ये तीन पदके तिरंदाजीत तर एक पदक शूटिंगमध्ये भारताने पटकावले. यामध्ये ज्योति सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांनी महिला कंपाउंड आर्चरी संघात चीनचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. तसेच मिक्स्ड कंपाउंड आर्चरी संघात चिकिता तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनी शूटऑफमध्ये दक्षिण कोरियाला धूळ चारत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि लॉस एंजिल्स 2028 ऑलिम्पिकसाठीही आपले तिकीट पक्के केले.
याशिवाय, मिक्स्ड ट्रॅप शूटिंग संघात नीरु ढांडा आणि किनान चेनाई या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. या भव्य यशाने भारताची पदक तालिकेतील स्थिती अधिक मजबूत केली असून, आगामी सामन्यांमध्ये आणखी पदके मिळण्याची दाट शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.