Jasprit Bumrah 100th T20 Match Milestone: एशियन गेम्स 2026 मधील पुरुष क्रिकेटच्या अत्यंत रोमांचक महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. आज (3 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या या फायनल सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 211 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून अभिषेक शर्माने अवघ्या 28 चेंडूंत 61 धावांची स्फोटक खेळी खेळली, तर तिलक वर्मा अवघ्या 22 चेंडूंत 51 धावांची तुफानी अर्धशतकीय खेळी खेळत संघाच्या धावसंख्येला मोठा आकार दिला.
याशिवाय, शिवम दुबेने 15 चेंडूंत 27 धावा आणि कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूंत 21 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात, 212 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 6 गडी बाद 192 धावांपर्यंतच मजल मारु शकला. पाकिस्तानकडून हसन नवाजने 51 चेंडूंत 96 धावांची झुंज दिली तरीही भारतीय गोलंदाजांनी विजयावर शिक्कामोर्तब केला.
या विजयापेक्षाही अधिक चर्चा रंगली ती भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या ऐतिहासिक कामगिरीची. पाकिस्तानविरुद्धचा हा महामुकाबला जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) कारकिर्दीतील 100वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ठरला. या कामगिरीसह बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून, तो भारतासाठी 100 टी-20 सामने खेळणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. भारताकडून यापूर्वी सर्वाधिक टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (159 सामने) अव्वल स्थानी आहे, तर हार्दिक पांड्या (138 सामने), विराट कोहली (125 सामने), सूर्यकुमार यादव (113 सामने) आणि अक्षर पटेल (107 सामने) यांचा समावेश आहे.
बुमराह आता या एलिट लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याच्या आधीचे सर्व खेळाडू फलंदाज किंवा अष्टपैलू आहेत. त्यामुळे भारतासाठी 100 टी-20 सामने खेळणारा तो पहिलाच गोलंदाज बनण्याचा मानकरी ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या या दबावाच्या फायनल सामन्यात बुमराहने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत 4 षटकांत 33 धावा दिल्या आणि पाकिस्तानी फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला हा विजय आणि बुमराहचा हा ऐतिहासिक मैलाचा दगड भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी कायमचा सुवर्णक्षणात रुपांतरित झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.