भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना 7 मार्चपासून सुरू होणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर खेळवला जाणार आहे.
दरम्यान, धरमशाला येथे गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. तसेच थंडीची लाटही आहे. भारत आणि इंग्लंड संघांचे खेळाडू जेव्हा धरमशाला येथे आले होते, तव्हाही पाऊस पडत होता. त्यामुळे सामन्यादरम्यान धरमशाला येथे वातावरण कसे असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हा सामना 7 मार्च रोजी सुरुवात होणार आहे, पण पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. भारतीय वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार धरमशालामध्ये 7 मार्च रोजी ढगाळ वातावरण असेल, तसेच पावसाच्या सरीही बरसण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर 8 आणि 9 मार्च रोजी म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. मात्र सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजेच 10 आणि 11 मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे.
याचबरोबर या पाचही दिवशी दिवसाचे तापमान 17 ते 18 डिग्री सेल्सियसच्या आसपास असू शकते, तर रात्री तापमानात घट होऊ शकते. रात्री 5 ते 6 डिग्री सेल्सियसच्या आसपास तापमान असू शकते.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की धरमशालामधील स्टेडियममध्ये पावसानंतर काहीवेळातच सामना सुरू होऊ शकतो, अशा सुविधा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार पाचव्या कसोटीसाठी फिरकीला पोषक खेळपट्टी बनवण्यात आली आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसू शकते.
या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने शानदार सुरुवात केली होती. परंतु, नंतर भारताने पुनरागमन करत दुसरा, तिसरा आणि चौथा सामनाही जिंकला. त्यामुळे भारतीय संघाने पाच सामन्यांच्या या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.