India vs Australia, 3rd Test, 2nd Day: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाचा दुसरा डाव 60.3 षटकात 163 धावांवर संपुष्टात आला आहे. पण पहिल्या डावातील 88 धावांच्या पिछाडीमुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर माफक 76 धावांचे आव्हान ठेवता आले आहे.
आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर तग धरून 75 धावा करून विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे. दरम्यान, आता तिसऱ्याच दिवशी हा सामना संपणार हे निश्चित झाले आहे.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर संपवल्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, लंचब्रेकनंतर लगेचच गिलला (5) नॅथन लायनने त्रिफळाचीत केले. त्यांनंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराने संयमी खेळ केला. पण लायनने रोहितचा (12) अडथळा दूर केला. तरी एक बाजू चेतेश्वर पुजाराने सांभाळली होती. मात्र, दुसऱ्या बाजूने भारतीय फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स दिल्या.
त्यातही श्रेयस अय्यरने पुजाराला साथ देण्याचा प्रयत्न केला. त्याने काही आक्रमक फटकेही मारले. मात्र मिशेल स्टार्कने त्याला 26 धावांवर माघारी धाडले. त्यापूर्वी विराट कोहली (13) आणि रविंद्र जडेजा (7) यांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्या होत्या.
तसेच पुजाराने एक बाजू सांभाळताना अर्धशतक केले, पण त्यानंतरही भारताची तळातील फलंदाजीही तग धरू शकली नाही आणि भारताचा डाव 163 धावांवर संपला. याबरोबरच दुसऱ्या दिवसाचा खेळही संपला. दरम्यान, पुजाराने 142 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 59 धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेल 15 धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 23.3 षटके गोलंदाजी करताना 64 धावांत 8 विकेट्स घेतल्या. तसेच मॅथ्यू कुहनेमन आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 109 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 197 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने 55 व्या षटकापासून 4 बाद 156 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. कॅमेरॉन ग्रीन आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी सुरुवाती टिच्चून खेळ केला होता. दरम्यान, रोहितने जवळपास पहिल्या तासात आर अश्विनला गोलंदाजी दिली नव्हती, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या या जोडीने घेतला.
पण अखेर अश्विनने चेंडू हातात आल्यानंतर 71 व्या षटकात पीटर हँड्सकॉम्बला 19 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर लगेचच उमेश यादवने ग्रीनचा (21) अडथळा दूर केला.
यानंतर अश्विन आणि उमेशच्या जोडीने ऑस्ट्रेलियाची शेपटी वळवळणार नाही याची काळजी घेतली आणि केवळ 11 धावांच्या अंतरात ऑस्ट्रेलिच्या शेवटच्या 6 विकेट्स काढल्या. ऑस्ट्रेलियाने 186 धावांवर पाचवी विकेट गमावल्यानंतर 197 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या.
या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.