India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारतीय संघाला रविवारी झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 10 विकेट्सने पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता तिसरा वनडे सामना निर्णायक ठरले.
विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक 118 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 11 षटकात बिनबाद 121 धावा करत पूर्ण केला. मिशेल स्टार्क आणि मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
महत्त्वाचे म्हणजे भारताविरुद्ध भारतात वनडेत दोन वेळा 10 विकेट्सने विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ देखील ठरला.
या सामन्यात भारताने दिलेल्या 118 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि मिशेल मार्श फलंदाजीसाठी उतरले होते. या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या फलंदाजीने हे दाखवून दिली की खेळपट्टी फलंदाजीसाठीही चांगली होती.
या दोघांनीही भारतीय गोलंदाजांना लय मिळू दिली नाही. त्यांनी एकमेकांना शानदार साथ देताना वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केले. याबरोबरच त्यांनी ताबडतोड फलंदाजी करत 11 षटकातच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मार्शने 6 चौकार आणि 6 षटकार मारत 36 चेंडूत 66 धावांची नाबाद खेळी केली. तसेच हेडने 30 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 51 धावा केल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कर्णधार स्टीव्ह स्मिथचा हा निर्णय योग्य ठरवला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सुरुवातीपासूनच तिखट मारा केला.
स्टार्कने शुभमन गिलला पहिल्याच षटकात शुन्यावर बाद केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरुवात केली होती. मात्र, स्टार्कनेच पाचव्या षटकात भारताला दुहेरी धक्के देत बॅकफूटवर ढकलले.
स्टार्कने या षटकात चौथ्या चेंडूवर रोहितला स्टीव्ह स्मिथच्या हातून झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर स्टार्कने सूर्यकुमार यादवला शून्यावर माघारी धाडले. सूर्यकुमार सलग दुसऱ्यांदा स्टार्कविरुद्ध शुन्यावर बाद झाला. त्याला पहिल्या वनडेतही स्टार्कने गोल्डन डकवर बाद केले होते.
स्टार्कने 9 व्या षटकात पहिल्या वनडेचा हिरो केएल राहुललाही स्वस्तात माघारी धाडले. त्यामुळे पहिल्या 9 षटकातच स्टार्कने भारताला मोठे धक्के दिले होते. इतकेच नाही, तर 10 व्या षटकात सीन ऍबॉटने उपकर्णधार हार्दिक पंड्याला बाद केले. हार्दिकचा सुरेख झेल स्टीव्ह स्मिथने घेतला.
यानंतरही भारतीय संघ सावरू शकला नाही. विराट कोहली आणि अक्षर पटेलने चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण विराटला 31 धावांवर नॅथन एलिसने बाद केलं. नंतर अक्षरला दुसऱ्या बाजूने कोणाची चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताचा डाव संपला, तेव्हा तो 29 धावांवर नाबाद राहिला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 26 षटकात सर्वबाद 117 धावाच केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तसेच सीन ऍबॉटने तीन विकेट्स घेतल्या आणि नॅथन एलिसने दोन विकेट्स घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.