ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनला झालेल्या कसोटीत चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (3 मार्च) 172 धावांनी विजय मिळलला. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग असल्याने गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
न्यूझीलंडला पराभव स्विकारावा लागल्याने भारतीय संघाला मात्र फायदा झाला आहे. न्यूझीलंडवा या पराभवामुळे टेस्ट चॅम्पियनशीपमधील अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वेलिंग्टन कसोटीपूर्वी न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 75 होती.
मात्र आता या पराभवामुळे ही टक्केवारी घसरून 60 झाली आहे. त्याचमुळे भारतीय संघ आता अव्वल क्रमांकावर आला असून न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय संघाची विजयी टक्केवारी 64.58 आहे.
टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेतील स्थान संघाच्या टक्केवारीनुसार ठरत असल्याने भारतीय संघाने न्यूझीलंडला मागे टाकले आहे. दरम्यान, या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया विजयानंतरही तिसऱ्याच क्रमांकावर कायम आहेत. त्यांची विजयी टक्केवारी 59.09 आहे.
आता भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा एकदा पहिल्या दोन स्थानांसाठी शर्यत पाहायला मिळणार आहे. कारण भारत आणि इंग्लंड संघात 7 मार्चपासून धरमशाला येथे कसोट मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जाणार आहे.
तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघात 8 मार्चपासून ख्राईस्टचर्चला कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू होणार आहे. हे दोन्ही सामने टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहेत. त्यामुळे या सामन्यातील निकालांनंतरही गुणतालिकेत बदल होऊ शकतात.
वेलिंग्टनला झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 383 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडला पहिल्या डावात केवळ 179 धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 204 धावांची आघाडी मिळाली होती.
मात्र ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी 164 धावातच संपला. परंतु, पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर 369 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव 196 धावांवरच संपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 172 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.