पणजीः मेघालयातील (Meghalaya) वीस वर्षीय मध्यरक्षक फ्रांग्की बुआम (Phrangki Buam) गतमोसमात एफसी गोवातर्फे (FC Goa) एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत फक्त एकच सामना व पंधरा मिनिटे खेळला. त्याला भारतीय फुटबॉल (India Football) मोसमासाठी लोनवर मुक्त करण्यात आले असून तो कोलकात्यातील मोहम्मेडन स्पोर्टिंगशी (Mohammedan Sporting) करारबद्ध झाला आहे. गतमोसमाच्या सुरवातीस फ्रांग्की याने शिलाँग लाजाँग संघाला सोडचिठ्ठी देत एफसी गोवाशी तीन वर्षांचा करार केला होता. लोनवर नव्या संघाशी करार केल्यामुळे फ्रांग्की 2021-22 मोसमात आंद्रे चेर्निशोव यांच्या मार्गदर्शनाखालील मोहम्मेडन स्पोर्टिंगकडून ड्युरँड कप, कोलकात्यातील प्रीमियर लीग, तसेच आय-लीग स्पर्धेत खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
आय-लीगमधील 2018-19 मोसमात शिलाँग लाजाँगकडून खेळताना फ्रांग्की चमकला होता. त्याने 20 सामन्यांत सहा गोल नोंदविले होते. गतमोसमात त्याने एफसी गोवाच्या जर्सीत एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत पदार्पण केले होते. अल वाहदा क्लबविरुद्ध तो बदली खेळाडूच्या रुपात मैदानात उतरला होता. मोहम्मेडन स्पोर्टिंगतर्फे त्याला जास्त मिनिटे खेळण्याची संधी मिळावी या उद्देशाने त्याला मुक्त करण्यात आले असून तो पक्का व्यावसायिक खेळाडू आहे, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी सांगितले. फ्रांग्कीचे भवितव्य उज्ज्वल असून एफसी गोवा संघात तो भरपूर अनुभव गाठीशी घेऊन परतेल, अशी आशाही फेरांडो यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.