India Won Asia Cup 2023:
भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला १० विकेट्सने पराभूत करत आशिया चषकावर नाव कोरले.
भारताने एकूण आठव्यांदा आशिया चषक जिंकला आहे. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने 2018 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच आशिया चषक जिंकला होता. त्यामुळे कर्णधार म्हणून रोहितने दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला आहे.
या सामन्यात श्रीलंकने भारतासमोर विजयासाठी 51 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 6.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केला. भारताकडून सलामीला आलेले इशान किशन 23 धावांवर आणि शुभमन गिल 27 धावांवर नाबाद राहिले.
तत्पुर्वी श्रीलंकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्याच षटकात कुशल परेरा जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळताना शुन्यावर बाद झाला.
त्यानंतर चौथ्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला आणि त्याने श्रीलंकेची दाणादाण उडवली. त्याने या षटकात पाथम निसंकाला (2) पहिल्या चेंडूवर, सदिरा समरविक्रमाला (0) तिसऱ्या चेंडूवर, चरिथ असलंकाला (0) चौथ्या चेंडूवर आणि धनंजय डी सिल्वाला (4) सहाव्या चेंडूवर बाद केले.
त्यानंतरही सहाव्या षटकात सिराजने दसून शनकाला शुन्यावर त्रिफळाचीत केले, तर १२ व्या षटकात कुशल मेंडिसला 17 धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर अखेरच्या तिन्ही विकेट्स हार्दिक पंड्याने घेतल्या.
श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दुशन हेमंता यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. हेमंता 13 धावावंर नाबाद राहिला. श्रीलंकाने 15.2 षटकात सर्वाबाद 50 धावा केल्या.
भारताकडून मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावांत 6 विकेट्स घेतल्या, तसेच हार्दिक पंड्याने 2.2 षटके गोलंदाजी करताना 3 धावांत 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने 5 षटकात 23 धावा देत 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.