World Cup 2023 Final: आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. भारतीय क्रिकेट चाहत्यांना 19 नोव्हेंबर 2023 ही तारीख त्यांच्या आठवणींमध्ये अजिबात ठेवायची नाही. विश्वचषक 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.
विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला आणि हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्टेडियममध्ये पोहोचले होते. पीएम मोदी संपूर्ण सामना पाहू शकले नाहीत, परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या मध्यात ते स्टेडियममध्ये पोहोचले होते.
भारतीय संघाच्या पराभवानंतर पीएम मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाला विश्वचषक 2023 च्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अंतिम सामन्यात तिन्ही डिपार्टमेंटमध्ये विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.
रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर (Social Media) मोदींसोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले की, 'टूर्नामेंट आमच्यासाठी छान होती, पण काल आम्ही थोडे कमी पडलो. आम्ही सर्वजण दु:खी आहोत, पण चाहत्यांचा पाठिंबा आम्हाला उभारी देतोय. काल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये आले तेव्हा आमच्यासाठी विशेष होते, ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायी होते.
दरम्यान, वेगवान गोलंदाज शमीने लिहिले की, "दुर्दैवाने काल (रविवार) आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, जे विशेषतः ड्रेसिंग रुममध्ये आले आणि आम्हाला प्रोत्साहन दिले. आम्ही परत येऊ!''
दुसरीकडे, भारतीय संघाने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत प्रत्येक सामना जिंकला होता. याचदरम्यान भारताने साखळी फेरीतही ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला होता.
विश्वचषक 2023 च्या साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने (Australia) दोन सामने गमावले होते. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि त्यानंतर अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. स्टार क्रिकेटर विराट कोहलीला या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, तर अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.