ICC World Test Championship Final 2023: जून 2023 मध्ये कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हे या स्पर्धेचे दुसरे पर्व असून या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने आधीच जागा पक्की केली आहे. आता या अंतिम सामन्यात जागा मिळवणारा दुसरा संघ ठरण्यासाठी भारत आणि श्रीलंका शर्यतीत आहेत.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान तिसऱ्या कसोटीत विजय मिळवत अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 68.52 इतकी असून त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थानही पक्के केले आहे.
भारतीय संघ सध्या 60.29 च्या विजयी टक्केवारीसह सध्या कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता जर भारतीय संघाला अंतिम सामन्यात थेट स्थान मिळवायचे असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये 9 मार्चला सुरु होणारा चौथा कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
जर हा सामना भारतीय संघ पराभूत झाला किंवा सामना अनिर्णित राहिला, तर मात्र भारतीय संघाच्या अंतिम सामन्यातील प्रवेशासाठी धोका निर्माण होऊ शकतो. कारण हा सामना भारताने जिंकला नाही, तर 9 मार्चपासूनच श्रीलंका आणि न्यूझीलंड संघात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या निकालावर भारतीय संघाला अवलंबून राहावे लागेल.
भारताला आशा करावी लागेल की श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही सामने जिंकू नये. या मालिकेत श्रीलंकेने एकही सामना गमावला किंवा अनिर्णित राहिला, तर मात्र भारतीय संघ अहमदाबाद कसोटीत काहीही निकाल लागला, तरी अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत सध्या 53.33 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल, तर त्यांना आशा करावी लागेल, की भारतीय संघ अहमदाबाद कसोटीत पराभूत होईल किंवा सामना अनिर्णित राहिल. तसेच श्रीलंकेला कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. असे झाले, तरच श्रीलंकेला अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी आहे.
श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे पहिला कसोटी सामना खेळायचा आहे, त्यानंतर 17 मार्चपासून वेलिंग्टनला दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे.
टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 चा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील लंडनमध्ये असलेल्या द ओव्हल मैदानावर होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.