ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan:
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सामना खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता सुरुवात होणार आहे.
हा वनडे वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान संघातील आठवा सामना असणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व सात सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ आपला विजय रथ कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे, तर पाकिस्तान संघ इतिहास बदलण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
दरम्यान, या सामन्यात भारताच्या कोणते 5 खेळाडू महत्त्वाचे ठरू शकतात, याकडे नजर टाकू.
विराट कोहली - भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोरमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यातही त्याने शतक झळकावले होते.
विराटचा पाकिस्तानविरुद्धची आकडेवारीही चांगली राहिली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 25 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 1150 धावा केल्या आहेत, यात 3 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत.
रोहित शर्मा - भारताचा कर्णधार रोहित शर्माही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतकही झळकावले आहे.
तसेच 2019 वर्ल्डकपमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही रोहितने शतक झळकावले होते. तसेच रोहितने पाकिस्तानविरुद्ध 29 आंतरराष्ट्रीय सामन्यात 901 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
जसप्रीत बुमराह - जसप्रीत बुमराहने दुखापतीतून पुनरागमन करत आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने आशिया चषकही भारताला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
तसेच त्याची सामन्याच्या सुरुवातीलाच विकेट घेण्याची क्षमता भारतासाठी महत्त्वाची ठरताना दिसत आहे. त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोरमध्येही पाकिस्तानविरुद्ध सुरुवातीला विकेट्स मिळून देत मोलाचा वाटा उचलला होता.
कुलदीप यादव - पाकिस्तानचे फलंदाज फिरकी गोलंदाजीविरुद्ध बऱ्याचदा संघर्ष करताना दिसतात. त्यातही गेल्या काही काळापासून कुलदीपविरुद्ध खेळताना पाकिस्तानचे फलंदाज अडचणीत सापडले आहेत.
त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोरमध्ये झालेल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 2019 वर्ल्डकपमध्येही त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
रविंद्र जडेजा - अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याच्यावरही या सामन्यात अनेकांचे लक्ष असेल. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्डकप 2023 च्या स्पर्धेतही 3 विकेट्स घेत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याची फिरकी गोलंदाजी पाकिस्तानविरुद्धची मदतगार ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.