ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Afghanistan, Rohit Sharma Century Records:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली.
या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी सलामीला फलंदाजी केली.
यादरम्यान रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याने आक्रमक खेळत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 63 चेंडूत शतक पूर्ण केले. या शतकी खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
हे रोहितचे वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील एकूण 7 वे शतक आहे. त्यामुळे तो वनडे वर्ल्डकपमध्ये 7 शतक करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला याबाबत मागे टाकले आहे. सचिनने वनडे वर्ल्डकपमध्ये 6 शतके केली आहेत.
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू
7 शतके - रोहित शर्मा
6 शतके - सचिन तेंडुलकर
5 शतके - रिकी पाँटिंग
5 शतके - कुमार संगकारा
या खेळीदरम्यान रोहितने वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या. तो वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील 23 वा खेळाडू ठरला आहे. असे असले तरी त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा क्रिकेटपटू बनण्याच्या डेव्हिड वॉर्नरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
रोहितने 19 व्या डावात या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. वॉर्नरनेही 19 डावातच वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे क्रिकेटर
19 डाव - डेविड वॉर्नर
19 डाव - रोहित शर्मा
20 डाव - सचिन तेंडुलकर
20 डाव - एबी डिविलियर्स
21 डाव - विव रिचर्ड्स
21 डाव - सौरव गांगुली
रोहितने या शतकी खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रमही नावावर केला आहे. त्याने याबाबत ख्रिस गेलच्या 553 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. रोहितने शतक केले, तेव्हा एकूण 555 षटकार झाले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
555 षटकार - रोहित शर्मा*
553 षटकार - ख्रिस गेल
476 षटकार - शाहिद आफ्रिदी
398 षटकार - ब्रेंडन मॅक्युलम
383 षटकार - मार्टिन गप्टील
359 षटकार - एमएस धोनी
रोहित शर्माचे हे वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूने केलेले सर्वात जलद शतकही ठरले आहे. तसेच वनडे कारकिर्दीतील 31 वे शतकही ठरले. त्यामुळे त्याने वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रिकी पाँटिंगला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे. पाँटिंगने 30 वनडे शतके केली आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर 49 शतकांसह सचिन तेंडुलकर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 47 शतकांसह विराट कोहली आहे.
वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू
49 शतके - सचिन तेंडुलकर
47 शतके - विराट कोहली
31 शतके - रोहित शर्मा
30 शतके - रिकी पाँटिंग
28 शतके - सनथ जयसूर्या
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.