Netherlands won Super Over against West Indies: वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेत हरारेमध्ये सोमवारी नेदरलँड्स विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रोमांचक सामना पाहायला मिळाला.
या सामन्यात नेदरलँड्सने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत वेस्ट इंडिजला पराभवाचा मोठा धक्का दिला. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्याची सध्या क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान, या विजयासह नेदरलँड्सने ग्रुप ए मध्ये दुसरे स्थान पक्के करत सुपर सिक्स फेरीतील प्रवेशही निश्चित केला.
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 374 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने आक्रमक शतक केले. त्याने 65 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 104 धावा केल्या.
तसेच ब्रेंडन किंगने 81 चेंडूत 76 धावांची खेळी केली, तर जॉन्सन चार्ल्सने 55 चेंडूत 54 धावांची खेळी केली. नेदरलँड्सकडून बास दे लीड आणि साकिब झुलफिकर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर तब्बल 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेदरलँड्सनेही चांगली सुरुवात केली. नेदरलँड्सच्या वरच्या फळीने दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या तेजा निदामनुरुने 11 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत 76 चेंडूत 111 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार स्कॉट एडवर्डची चांगली साथ मिळाली. त्याने 67 धावांची खेळी केली.
अखेरच्या षटकात नेदरलँड्सला 9 धावांची आणि वेस्ट इंडिजला 3 विकेट्सटी गरज होती. यावेळी या षटकात अल्झारी जोसेफने गोलंदाजी करताना पहिल्या दोन चेंडूतच 5 धावा दिल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 16 धावांवर खेळणाऱ्या आर्यन दत्तला बाद केले. त्यानंतरही पुढील दोन चेंडूवर 3 धावा निघाल्या.
त्यामुळे अखेरच्या चेंडूवर 1 धावेची गरज असताना जोसेफने लोगन वॅन बिकला बाद केले. त्याचा 28 धावांवर जेसन होल्डरने झेल घेतला. त्यामुळे नेदरलँड्सच्याही 50 षटकात 9 बाद 374 धावा झाल्या. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
हा सामना निर्धारीत 50-50 षटकानंतर बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर घेण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये आधी नेदरलँड्सने फलंदाजी केली. नेदरलँड्सकडून लोगन वॅन बिक आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स फलंदाजीला उतरले, तर वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने गोलंदाजी केली.
दरम्यान, नेदरलँड्सकडून सुपर ओव्हरमधील सर्व 6 चेंडू वॅन बिकने खेळले. त्याने या सर्व ६ चेंडूवर आक्रमक फटकेबाजी करताना तब्बल 30 धावा काढल्या. त्याने तीन षटकार आणि तीन चौकार मारले. त्यामुळे वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 31 धावा करण्याचं आव्हान होतं.
वेस्ट इंडिजकडून चार्ल्स आणि शाय होप फलंदाजीला उतरले, तर नेदरलँड्सकडून गोलंदाजी करण्यासाठीही वॅन बिकच उतरला. त्याने पहिल्या तीन चेंडून एका षटकारासह 8 धावा दिल्या. पण चौथ्या चेंडूवर त्याने चार्ल्सला आणि पाचव्या चेंडूवर होल्डरला बाद केले. त्यामुळे सामना तिथेच संपला आणि नेदरलँड्सने थरारक विजय मिळवला.
दरम्यान, आता ग्रुप ए मधून यजमान झिम्बाब्वेने अव्वल क्रमांक मिळवला आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड्स असून तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज राहिले. त्यामुळे या तिन्ही संघांना सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळाला आहे. पण याच ग्रुपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेला नेपाळ आमन पाचव्या क्रमांकावरील अमेरिका संघाचे आव्हान संपले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.