पणजी Goa Sports : माजी विजेत्या गोव्याने (Goa) संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल (Football) स्पर्धेच्या पश्चिम विभागीय पात्रता फेरीत विजयी घोडदौड राखली. शुक्रवारी त्यांनी दादरा-नगर हवेली संघाचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला. सामना गुजरातमधील भावनगर येथे झाला.
सलग दुसऱ्या विजयासह गोव्याचे आता सहा गुण झाले असून ते अव्वल स्थानी आहेत. या गटातील अन्य एका लढतीत गुजरातने दमण-दीवला 2-1 फरकाने हरविले. गुजरातचे चार गुण झाले आहेत. गोव्याने अगोदरच्या लढतीत दमण-दीवला 2-0 फरकाने हरविले होते. गोव्याविरुद्ध आज पराभूत झाल्यामुळे दादरा-नगर हवेलीचा एक गुण कायम राहिला.
गोव्यासाठी शुक्रवारच्या लढतीत उमंग गायकवाड याने 14 व्या मिनिटास पहिला गोल केला. त्याने शालम पिरीस याच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवा दिला. या गोलमुळे विश्रांतीच्या ठोक्यास गोव्याचा संघ 1-0 असा आघाडीवर होता. उत्तरार्धाच्या खेळातील सुरवातीस गोव्याला पेनल्टी फटका मिळाला. दादरा-नगर हवेलीच्या खेळाडूने गोव्याच्या ज्योव्हियल डायस याला गोलक्षेत्रात पाडले. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर सूरज हडकोणकर याने अचूक फटका मारला. नंतर साईश बागकर याच्या असिस्टवर कुणाल साळगावकरने गोव्याची आघाडी 3-0 अशी भक्कम केली.
सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना गोव्याला आणखी एक पेनल्टी फटका मिळाला. यावेळी कुणाल साळगावकरला गोलक्षेत्रात धोकादायक टॅकल करण्यात आले. पुन्हा एकदा सूरज हडकोणकर याने अचूक नेमबाजी करताना सामन्यातील आपला वैयक्तिक दुसरा पेनल्टी गोल नोंदविला. गोव्याचा गोलरक्षक जेसन डिमेलो याचे गोलरक्षण दक्ष ठरले. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांची आक्रमणे यशस्वी ठरू शकले नाहीत. सामन्याच्या भरपाई वेळेत कुणाल साळगावकरने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून गोव्याची आघाडी 5-0 अशी विजयी ठरविली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.