WPL 2023: मुंबईमध्ये सध्या वूमन्स प्रीमियर लीगचा (WPL) पहिला हंगाम खेळवला जात आहे. हा डब्ल्यूपीएलचा पहिलाच हंगाम असल्याने ऐतिहासिक ठरला आहे. याबरोबरच या हंगामाने आणखी एका नियमाची टी20 क्रिकेटमध्ये सुरुवात करून दिली आहे. हा नियम म्हणजे नो-बॉल आणि वाईड चेंडूसाठी रिव्ह्यू घेणे.
आत्तापर्यंत डब्ल्यूपीएलमध्ये तीन सामने झाले असून अनेकदा खेळाडू नो-बॉल आणि वाईडसाठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमची (डीआरएस) मागणी करताना दिसले आहेत. रविवारी युपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्यात तर रोमांचक ठरलेल्या अखेरच्या सामन्यात दोन वेळा वाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आले, जे सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी महत्त्वाचेही ठरले.
दरम्यान, असे पहिल्यांदाच झाले आहे की एखाद्या टी20 लीगमध्ये वाईड आणि नो-बॉल तपासण्यासाठी खेळाडूंना डीआरएस घेण्याची परवानगी मिळाली आहे. आता हाच नियम आगामी आयपीएलमध्येही वापरला जाणार असल्याची माहीती समोर येत आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार संघ केवळ डब्ल्यूपीएलमध्येच नाही, तर आगामी आयपीएलमध्ये देखील फलंदाज बाद आहे की नाही, याव्यतिरिक्त वाईड आणि नो-बॉलसाठी देखील त्यांना देण्यात आलेल्या डीआरएसचा वापर करू शकतात.
डब्ल्यूपीएलचा नियम असे सांगतो की टाईम आऊटचा अपवाद वगळता फलंदाज बाद आहे की नाही, याबद्दल मैदानातील पंचांनी दिलेल्या निर्णायविरुद्ध खेळाडू रिव्ह्यूसाठी विनंती करू शकतात. तसेच खेळाडू मैदानावरील पंचांनी वाईड आणि नो-बॉलबद्दल दिलेल्या निर्णयालाही आव्हान देण्यासाठी रिव्ह्यूची मागणी करू शकतात.
दरम्यान, प्रत्येक संघांना सामन्याच्या प्रत्येक डावात 2 डिआरएस घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे वाईड आणि नो-बॉलचे रिव्ह्यू देखील याच निर्धारित 2 रिव्ह्यूचाच भाग असतील. तसेच लेग बाईजच्या निर्णयासाठी मात्र रिव्ह्यूचा वापर होणार नाही.
हा नियम आत्तापर्यंततरी डब्ल्यूपीएलमध्ये महत्त्वाचा ठरला आहे. कारण आत्तापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये हे रिव्ह्यू सामन्याला काहीप्रमाणात वळण देणारे ठरले आहेत. तसेच आगामी आयपीएलमध्ये देखील हा नियम महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीही मैदानावरील पंचांच्या निर्णयामुळे काही वाद झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.