Cricket in Los Angeles 2028 Olympics :
क्रिकेट चाहत्यांसाठी सोमवारी (16 ऑक्टोबर) एक आनंदाची बातमी आली आहे. लॉस एंजेलिसला 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटही खेळले जाणार आहे, यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समीतीने (आयओसी) शिक्कामोर्तब केले आहे.
मुंबईत नुकतीच आयओसीची 141 वी बैठक झाली. या बैठकीत क्रिकेटच्या टी20 प्रकाराच्या ऑलिम्पिकमधील समावेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, केवळ क्रिकेटच नाही, तर 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लैकॉक्स (सिक्सेस) आणि स्कॅश या खेळांचाही समावेश करण्यात आला आहे.
आयसीसी गेल्या काही वर्षापासून क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करत होते. तसेच त्यांनी गेल्या वर्षांपासून तशी प्रक्रियाही पार पाडली होती. अखेर तब्बल 128 वर्षांनी पुन्हा एकदा क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार आहे. क्रिकेटच्या समावेशाने ऑलिम्पिकला अधिक व्ह्युवरशिप मिळू शकते अशी आशाही आता व्यक्त होत आहे.
दरम्यान, क्रिकेटचा याआधी गेल्यावर्षी राष्ट्रकूल आणि नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. आता क्रिकेट ऑलिम्पिकमध्येही दिसेल.
याबद्दल आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बारक्ले म्हणाले, 'आयओसीने 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबद्दल घोषणा केल्यानंतर आम्ही आनंदी आहोत. आता 2028 ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे.' तसेच त्यांनी आयओसीचे आभारही मानले आहेत.
दरम्यान, यापूर्वी केवळ एकदाच क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आले आहे. 1900 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन संघात कसोटी क्रिकेट सामना झाला होता. या सामन्यात ग्रेट ब्रिटनने 158 धावांनी विजय मिळवला होता.
मात्र, 1900 नंतर गेल्या 128 वर्षात कधीही ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळवण्यात आले नव्हते. त्यामुळे आयसीसीकडून ऑलिम्पिकमध्ये समावेश केला जावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच आता अमेरिकेत क्रिकेटचाही प्रसार होत आहे, याचा फायदा होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.