Ranji Cricket Goa vs Chhattisgarh: प्रतिस्पर्धी फलंदाजांनी प्रतिहल्ला चढविल्यानंतर गोव्याचे गोलंदाज सैरभैर बनले, विशेषतः फिरकी गोलंदाजी साफ भरकटली. त्याचा लाभ उठवत छत्तीसगडने रणजी करंडक क्रिकेट सामन्यात धावांचा पर्वत रचताना पहिला डाव 9 बाद 531वर घोषित केला.
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर बुधवारी गोव्याने 1 बाद 51 धावा केल्या.
छत्तीसगडच्या वासुदेव बरेथ (48, 105 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार) व रवी किरण (46, 36 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार) या शेवटच्या विकेटने 78 चेंडूत नाबाद ७७ भागीदारी करून गोव्याच्या जखमेवर जास्तच मीठ चोळले.
उपाहारानंतर गोव्याचा वेगवान गोलंदाज लक्षय गर्ग याने सलग चेंडूवर प्रतिस्पर्धी कर्णधार हरप्रीतसिंग भाटिया (96, 164 चेंडू, 12 चौकार, 2 षटकार) व शशांक सिंग यांना बाद केले तेव्हा छत्तीसगडची 8 बाद 409 अशी स्थिती होती, पण नंतर शेवटच्या दोन विकेटने धावसंख्येत 122 धावांची भर टाकली. यामध्ये शाहवाझ हुसेन यानेही 40 धावांचे योगदान दिले. गोव्याचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर दुखापतीमुळे बुधवारी मैदानात उतरला नाही.
गोव्यासमोर मोठे आव्हान
गोव्याला पहिल्या डावात खूप लवकर धक्का बसला. मध्यमगती रवी किरण याच्या चेंडूने ऑफस्टंपचा कधी वेध घेतला हे सलामीवीर मंथन खुटकर (3) याला समजलेच नाही. यावेळी धावफलकावर 18 धावा होत्या. दिवसअखेर ईशान गडेकर 28, तर सुयश प्रभुदेसाई 13 धावांवर खेळत होता. गोव्याचा संघ अजून 480 धावांनी मागे आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 382 धावा करणे आवश्यक आहे.
संक्षिप्त धावफलक
छत्तीसगड, पहिला डाव (4 बाद 273 वरुन)ः 155 षटकांत 9 बाद 531 घोषित (हरप्रीतसिंग भाटिया 96, अमनदीप खरे 1, शशांक सिंग 19, अजय मंडल 16, शाहबाझ हुसेन 40, वासुदेव बरेथ नाबाद 48, रवी किरण नाबाद 46, अर्जुन तेंडुलकर 12-2-34-0, लक्षय गर्ग 28-6-88-3, विजेश प्रभुदेसाई 32-4-102-3, दर्शन मिसाळ 40-6-108-1, मोहित रेडकर 31-2-140-1, दीपराज गावकर 12-2-42-1).
गोवा, पहिला डाव ः 17 षटकांत 1 बाद 51 (मंथन खुटकर 3, ईशान गडेकर नाबाद 28, सुयश प्रभुदेसाई नाबाद 13, रवी किरण 1-20).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.