ICC Awards 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटू 2022 पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे.
या पुरस्कारासाठी सूर्यकुमारसह सिकंदर रझा, सॅम करन आणि मोहम्मद रिझवान यांनाही नामांकने मिळाली होती. पण सूर्यकुमारने अन्य तीन क्रिकेटपटूंना मागे टाकत सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला आहे.
सूर्यकुमारसाठी 2022 हे वर्ष यशस्वी ठरले होते. त्याने या संपूर्ण वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. त्याने 2022 मध्ये 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या. त्याने 2022 वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 9 अर्धशतकेही झळकावली.
तसेच सूर्यकुमार 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाजही होता. इतकेच नाही, तर एका वर्षाच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला होता.
त्याच्यापूर्वी असा कारनामा केवळ पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाच करता आला आहे. त्याने 2021 साली1326 धावा केल्या होत्या.
सूर्यकुमारने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 68 षटकारही मारले होते. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्येही जवळपास 189 च्या स्ट्राईक रेटने आणि 59.75 च्या सरासरीने 239 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकेही झळकावली होती.
त्याची ही कामगिरी पाहाता, सूर्यकुमारला बीसीसीआय निवड समीतीने जानेवारी 2023 महिन्यातील श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकांसाठी भारतीय संघाचा उपकर्णधारही केले आहे.
मॅकग्रा सर्वेत्तम महिला टी20 क्रिकेटपटू
दरम्यान, आयसीसी सर्वोत्तम टी20 महिला क्रिकेटपटू 2022 पुरस्कार ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटपटू ताहलिया मॅकग्राने मिळवला आहे. तिने 2022 वर्षाच 435 धावा केल्या होत्या आणि 13 विकेट्सही घेतल्या होत्या.
या पुरस्कारासाठी तिच्याव्यतिरिक्त भारताची स्मृती मानधना, पाकिस्तानची निदा दार आणि न्यूझीलंडची सोफी डिवाईन यांना नामांकन मिळाले होते. पण ताहलियाने सर्वांना मागे टाकत या पुरस्कारावर नाव कोरले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.