पणजी : गोव्याची इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी हिने पुणे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार खेळ करताना महिलांत अव्वल क्रमांक मिळविला. स्पर्धेतील प्रमुख महिला बुद्धिबळपटूंत भक्तीची कामगिरी सरस ठरली. भक्ती माजी आशियाई महिला बुद्धिबळ विजेती आहे.
28 जुलैपासून चेन्नईत होणाऱ्या ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत भक्तीची भारतीय महिला अ संघात निवड झाली आहे. पुण्यातील स्पर्धेत तिने राष्ट्रीय विजेती वूमन ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, माजी राष्ट्रीय विजेती सौम्या स्वामिनाथन, मेरी ॲन गोम्स, निशा मोहोता, स्वाती घाटे, प्रियांका नुटाक्की या भारतीय महिला बुद्धिबळपटूंना मागे टाकले. अझरबैजानची अयान अल्लाव्हर्दियेवा, कोलंबियाची अँजेला फ्रँको, व्हिएतनामची गुयेन थान थिए, रशियाची अनास्तासिया सोबोलोवा या परदेशी खेळाडूंनाही भक्तीला गाठणे शक्य झाले नाही.
बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेपूर्वीची ही कामगिरी उत्साहवर्धक आहे, त्यामुळे आत्मविश्वास उंचावल्याची प्रतिक्रिया भक्तीने व्यक्त केली. बुद्धिबळ ऑलिंपियाडपूर्वी मातब्बर खेळाडूंविरुद्धची चांगली कामगिरी मनोबल उंचावणारी आहे, असेही तिने नमूद केले. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर यांच्या हस्ते भक्तीने महिला गटातील विजेतेपदाचे बक्षीस स्वीकारले.
येत्या रविवारी (ता. 19 जून) नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुद्धिबळ ऑलिंपियाड ज्योत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी पाच वेळचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याच्यासह भारताचे प्रमुख बुद्धिबळपटू पंतप्रधानांसमवेत व्यासपीठावर असतील, त्यात भक्तीचाही समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने भक्तीला निमंत्रित केले आहे. या कायक्रमासाठी भक्ती शनिवारी दिल्लीस रवाना होईल. बुद्धिबळ ऑलिंपियाड ज्योत कार्यक्रमासाठी मानाचे स्थान मिळाल्याबद्दल गोव्याची मंत्री नीलेश काब्राल, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, किशोर बांदेकर, शरेंद्र नाईक यांनी भक्तीचे अभिनंदन केले असून शुभेच्छाही दिल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.