ऑस्ट्रेलियातील हॉर्स रेसिंग जगतातून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. अवघ्या २२ वर्षांच्या महिला जॉकीचा घोड्यावरून पडून झालेल्या गंभीर अपघातात मृत्यू झाला आहे. इजी नील असे या तरुण जॉकीचे नाव असून, न्यू साउथ वेल्स येथे घोड्यांच्या शर्यतीदरम्यान हा अपघात घडला. उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देणाऱ्या इजीने अखेर १० नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील घोड्यांच्या शर्यतींच्या विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'वॉरेन शायर कॉटन कप' या स्पर्धेत इजी नील सहभागी झाली होती. शर्यत सुरू असताना सुमारे ४०० मीटरचा टप्पा पार करताना तिचा घोड्यावरील ताबा सुटला. त्यामुळे ती घोड्यावरून खाली कोसळली. हा अपघात इतका गंभीर होता की, जमिनीवर पडताच इजी बेशुद्ध झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तातडीने तिच्यावर प्राथमिक उपचार केले.
अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन इजीला तातडीने एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला लाइफ सपोर्टवर ठेवले होते. मात्र, वैद्यकीय पथकाचे प्रयत्न आणि उपचार सुरू असूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर १० नोव्हेंबर रोजी तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी तिचे निधन झाल्याने क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेत इजी ज्या 'मारनू' नावाच्या घोड्यावर स्वार होती, तोदेखील गंभीर जखमी झाला होता. त्याच्या दुखापतींचे स्वरूप लक्षात घेता पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याला मानवी आधारावर इच्छामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. याच शर्यतीदरम्यान डिएगो मोंटेस डी ओका हा आणखी एक जॉकी घोड्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाली. दुर्घटनेनंतर आयोजकांनी स्पर्धेतील अखेरची शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेतला.
इजीच्या निधनाची अधिकृत माहिती रेसिंग एनएसडब्ल्यूच्या माध्यमातून तिच्या कुटुंबीयांनी दिली. कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तिच्या घोड्यांवरील प्रेमाचा विशेष उल्लेख केला आहे. चालायला शिकण्यापूर्वीपासूनच इजी घोडेस्वारी करत होती. घोड्यांशी असलेले तिचे नाते केवळ छंदापुरते मर्यादित नव्हते, तर तो तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. पुढे याच आवडीतून तिने हॉर्स रेसिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिच्या निधनामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि संपूर्ण रेसिंग समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
इजीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांनी अत्यंत कठीण प्रसंगातही एक सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी इजीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आपल्या मुलीच्या निधनाचे दु:ख असतानाही इतरांचे आयुष्य वाचवण्याची संधी मिळावी, या भावनेतून कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.
यावेळी कुटुंबीयांनी रेसिंग समुदाय, एनएसडब्ल्यू जॉकी असोसिएशन आणि रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. दरम्यान, न्यू साउथ वेल्समधील हॉर्स रेसिंग स्पर्धेत जॉकीचा मृत्यू होण्याची ही एप्रिल २०१७ नंतरची पहिली घटना असल्याचे वृत्त आहे. त्यावेळी डॅरेन जोन्स या जॉकीचा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. इजीच्या निधनामुळे घोडेस्वारी आणि रेसिंग क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.