पणजी ः एक खेळाडू कमी झाल्यानंतर भरपाई वेळेतील शेवटचे मिनिट बाकी असताना फिनलंडचा विश्वकरंडक खेळाडू जॉनी कौको याने सणसणीत फटक्यावर केलेल्या गोलमुळे आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेत एटीके मोहन बागानची अपराजित मालिका कायम राहिली. शेवटच्या क्षणी झालेल्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्सचा विजय हिरावला गेला आणि सामन्यात 2-2 अशी गोलबरोबरी झाली, तसेच उपांत्य फेरीसाठी चुरसही वाढली. सामना शनिवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला.
त्यापूर्वी केरळा ब्लास्टर्सच्या (Kerala Blasters) 29 वर्षीय ॲड्रियन लुना याचे दोन्ही गोल डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. सातव्याच मिनिटास थेट फ्रीकिक फटक्यावर उरुग्वेच्या मध्यरक्षकाने एटीके मोहन बागानचा अनुभवी गोलरक्षक अमरिंदर सिंग याला पूर्णपणे हतबल ठरविले. नंतर 64व्या मिनिटास गोलक्षेत्राच्या कोपऱ्यावरून लाँग रेंजर फटका अचूकपणे मारत अमरिंदरची निराशा वाढविली. केरळा ब्लास्टर्सने पूर्वार्धात आघाडी घेतल्यानंतर लगेच आठव्या मिनिटास प्रतिहल्ल्यावर ऑस्ट्रेलियन आघाडीपटू डेव्हिड विल्यम्स याने एटीके मोहन बागानला बरोबरी साधून दिली.
प्रीतम कोटलच्या असिस्टवर त्याने वेगवान फटक्यावर चेंडूचा नेम चुकविला नाही. सामन्याच्या भरपाई वेळेत केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक प्रभसुखन गिल व बचावपटूंच्या दक्षतेमुळे एटीके मोहन बागानला बरोबरी साधता आली नाही. मात्र 90+6 व्या मिनिटास कौको याचा ताकदवान फटका गोलरक्षकाने झेपावत अडविण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हातून निसटला आणि नेटमध्ये गेला. 90 व्या मिनिटास एटीके मोहन बागानच्या प्रबीर दास याला रेफरीने थेट रेड कार्ड दाखविले.
बरोबरीमुळे हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानची अपराजित मालिका 12 सामन्यांपर्यंत लांबली. या कालावधीत त्यांनी सहा विजय, सहा बरोबरीची नोंद केली. एकंदरीत त्यांचे आता 16 लढतीनंतर 30 गुण झाले असून हैदराबादवर त्यांनी एका गुणाची आघाडी घेतली. केरळा ब्लास्टर्सचे 16 लढतीनंतर 27 गुण झाले असून ते चौथ्या स्थानी कायम आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.