Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. भारताचे दिग्गज खेळाडू एकामागून एक पदके जिंकत आहेत. या मालिकेत भारताला आणखी एक रौप्यपदक मिळाले आहे.
ऍथलीट पारुल चौधरीने सोमवारी चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले.
भारतीय अॅथलीट प्रीतीनेही तिसरे स्थान मिळवत कांस्यपदक पटकावले आहे. पारुलने 9:27.63 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले.
दरम्यान, या विजयासह दोन्ही खेळाडूंनी इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये एकाच वेळी दोन पदके जिंकली आहेत. एशियाडच्या चार आवृत्त्यांमध्ये भारताने पाच पदके जिंकली आहेत.
सुधा सिंगने 2010 च्या एशियाडमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर ललिता बाबरने 2014 इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुधा सिंगने भारतासाठी रौप्य पदक जिंकले.
यानंतर आता पारुल आणि प्रीती यांनी 2023 हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. भारताने (India) प्रत्येकी 2 पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अंतिम फेरीत बहरीनच्या यावी विन्फ्रेड मुतिलेने 9:18:28 या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. पारुलने 9:27:63 वेळेसह दुसरे स्थान पटकावले.
त्याचवेळी प्रीती आणि बहरीनच्या मेकोनेन यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, शेवटच्या क्षणांमध्ये प्रीतीला तिसरे स्थान गाठण्यात यश मिळाले.
महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये बहरीन हा सर्वात यशस्वी देश आहे. त्याने या स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारताच्या नावावर एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.
चीनने दोन रौप्य, तर जपान (Japan) आणि व्हिएतनामने प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले आहे. स्टीपलचेस हा एक आव्हानात्मक ट्रॅक आणि फील्ड खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडूंना विविध आव्हाने दिली जातात. या गेममध्ये धावपटूला काही अडथळे पार करुन शर्यत पूर्ण करावी लागते.
पारुलने नुकत्याच बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीतही आश्चर्यकारक कामगिरी केली होती. या शर्यतीत ती 11व्या स्थानावर राहिली होती, पण तिने राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये, तिने 9:15.31 वेळेसह शर्यत पूर्ण केली होती. पारुल पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरली होती.
त्यानंतर तिने ललिता बाबरचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. ललिताने रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस शर्यत 9:19.76 वेळेत पूर्ण केली होती.
दुसरीकडे, सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या भारतीय जोडीचा सोमवारी हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरीच्या टेबल टेनिस उपांत्य फेरीत उत्तर कोरिया प्रजासत्ताकच्या चा सुयोंग आणि पाक सुग्योंग यांच्यात सामना झाला. रोमहर्षक लढतीत दोघींचा पराभव झाला असला तरी तरीही त्यांनी कांस्यपदकावर कब्जा केला.
सुतीर्था आणि अहिका यांनी सकारात्मक सुरुवात करत पहिला गेम 11-7 असा जिंकला, परंतु उत्तर कोरियाच्या जोडीने जोरदार झुंज देत जोरदार पुनरागमन केले.
त्यामुळे 6 सेट पूर्ण होईपर्यंत दोन्ही संघांचे 3-3 गुण होते. मात्र, भारतीय जोडी निर्णायक सेटमध्ये 11-2 अशी पिछाडीवर पडली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
उपांत्य फेरीच्या मार्गावर, भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या मेंग चेन आणि यिदी वांग यांचा पराभव करुन आपल्या देशासाठी पदकावर शिक्कामोर्तब केला होता.
या जोडीने 11-5, 11-5 अशी चार गेमची लढत जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेची उपांत्य फेरी 5-11 आणि 11-9 ने जिंकली. चीनची जोडी सध्याची जगज्जेती आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.