पणजी : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या गोव्याच्या वालंका नताशा आलेमाव यांना रविवारी धक्का बसला. अध्यक्षपद उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाचे नाव संबंधिताच्या परवानगीशिवाय वापरल्याच्या कारणास्तव निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे नवी दिल्ली येथे जाहीर केले.
एआयएफएफ निवडणुकीसाठी सादर अर्जांची छाननी रविवारी झाली. त्यानंतर आता प्रतिष्ठेच्या अध्यक्षपदासाठी माजी गोलरक्षक कल्याण चौबे, माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांच्यासह कर्नाटकचे एन. ए. हॅरिस, दिल्लीचे डॉ. शाजी प्रभाकरन, पश्चिम बंगालचे अजित बॅनर्जी या पाच जणांत चुरस असेल. वालंका यांच्याप्रमाणे मानवेंद्र सिंग यांचाही अध्यक्षपदाचा अर्ज फेटाळण्यात आला.
(All India Football Federation Elections)
निवडणुकीसाठी 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले, तर 20 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची यादी अधिसूचित करण्यात आली. सादर उमेदवारी अर्जांची रविवारी सकाळी अकरा वाजता छाननी झाली.
चर्चिलकन्येला दणका
वालंका या चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असून गोवा फुटबॉल असोसिएशनचे (जीएफए) अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांच्या कन्या आहेत. वालंका यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जास आक्षेप घेणारी गोवा फुटबॉल असोसिएशन सदस्य जोनाथन डिसोझा यांची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यास शनिवारी (ता. 20) मिळाली. त्याची दखल घेत चौकशी प्रक्रियेनंतर तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्ध झाले आणि त्यानंतर वालंका यांचा अध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरवून फेटाळण्यात आला.
अर्जावरील अनुमोदक अनभिज्ञ
वालंका आलेमाव यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावर दमण-दीव फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अमित खेमानी यांचे अनुमोदक या नात्याने नाव होते. अमित खेमानी हे 16 ऑगस्टपासून देशाबाहेर असूनही ते वालंका यांचे अनुमोदक कसे असू शकतात अशी विचारणा जोनाथन यांनी तक्रारीत केली होती.
निवडणूक अधिकाऱ्याने याबाबत पुष्टी करण्याची विनंती खेमानी यांना केली. 20 ऑगस्ट रोजी ई-मेल पाठवून आपल्या माहितीशिवाय नाव वापरण्यात आले, तसेच कोणाही उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रावर आपण सही केली नसल्याचे खेमानी यांनी स्पष्ट केले.
खजिनदार, सदस्यपदाचा अर्ज ग्राह्य
वालंका आलेमाव यांनी एआयएफएफ निवडणुकीत खजिनदार, तसेच सदस्यपदासाठीही उमेदवारी अर्ज सादर केला आहे. रविवारी छाननीनंतर हे दोन्ही अर्ज ग्राह्य ठरले. त्यामुळे त्या आता या दोन्ही पदांसाठी निवडणूक रिंगणात असतील. खजिनदारपदासाठी सहा, तर सदस्यपदासाठी अकरा उमेदवारांत निवडणूक होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.