Abu Dhabi International Chess Masters Tournament: गोव्याचा फिडे मास्टर बुद्धिबळपटू ऋत्विज परब आता इंटरनॅशनल मास्टर (आयएम) खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. अबुधाबी येथील आंतरराष्ट्रीय चेस मास्टर्स स्पर्धेत त्याने आयएम किताबासाठीसाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म प्राप्त केला.
एलो मानांकनात २४०० गुणांचा टप्पा गाठल्यानंतर ‘फिडे’कडून त्याच्या आयएम किताबावर शिक्कामोर्तब होईल.
ऋत्विजने कारकिर्दीतील सर्वोत्तम २३९२ गुणांचा मानांकन नोंदविले आहे. त्याला गतवर्षी फिडे मास्टर किताब मिळाला होता. स्टँडर्ड बुद्धिबळात त्याचे सध्या २३६९ एलो गुण आहेत.
ऋत्विजने अबुधाबीतील बुद्धिबळ स्पर्धेत १०७व्या मानांकनावरून ३४वा क्रमांक मिळविला. त्याने नऊ फेऱ्यांतून साडेपाच गुणांची कमाई केली. त्याने चार विजय व तीन बरोबरीची नोंद केली. दोन डावात तो पराभूत झाला.
पहिल्या डावात अझरबैजानचा आयएम अहमद अहमदझादा याला बरोबरीत रोखल्यानंतर ऋत्विजला अनुक्रमे चीनचा ग्रँडमास्टर ली डी व कझाकस्तानचा आयएम नोगेरबेक काझिबेक यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
नंतर ऋत्विजने फिडे मास्टर अम्मार सेद्रानी याला हरविले, तर आयर्लंडचा फिडे मास्टर इब्राहिम हेराब हमीद्रेझा, भारताची वूमन ग्रँडमास्टर प्रियांका नुटाक्की यांना बरोबरीत रोखले. त्यानंतर त्याने सलग तीन विजय नोंदविले.
चीनची वूमन इंटरनॅशनल मास्टर झोऊ गुईजे, भारताचा आयएम जिमी झुबिन, उझबेकिस्तानचा आयएम मादामिनोव मुखिद्दीन यांना ऋत्विजने नमविले.
ऋत्विजने आयएम किताबाचा पहिला नॉर्म २०१५ साली बँकॉकमध्ये मिळविला होता, नंतर दुसरा नॉर्म २०१८ मध्ये जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय सीनियर बुद्धिबळ स्पर्धेत मिळविला होता. तिसऱ्या नॉर्मसाठी त्याला पाच वर्षे थांबावे लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.