आपल्यापैकी बरेचजण आपला दिवस ऑफिसमधल्या कॉफी मशीनने सुरुवात करतात. मग सकाळ असो की दुपार बहुतेक लोक ऑफिसच्या कॉफी मशीनमधून कॉफी पितात, परंतु ही कॉफी तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते. एका नवीन संशोधनातून यासंबंधी धक्कादायक खुलासा झाला आहे. कॉफी तुमच्या आरोग्यासाठी विशेषतः तुमच्या हृदयासाठी हानिकारक ठरु शकते. चला तर मग ऑफिसमधल्या कॉफी मशीनमधून कॉफी पिण्यामुळे आरोग्याला काय हानी पोहोचू शकते याबाबत जाणून घेऊयात...
दरम्यान, संशोधकांनी चार वेगवेगळ्या ऑफिसमधल्या 4 कॉफी मशीनमधून सॅम्पल गोळा करुन त्यांचे विश्लेषण केले. या मशीनींमध्ये तीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. काहींमध्ये मेटलचा फिल्टर होता, तर काहींमध्ये लिक्विड कॉफी कॉन्सन्ट्रेट वापरला गेला होता तर एका ठिकाणी कॉफी मशीनमधून इन्स्टंट फ्रीज-ड्राईड कॉफी दिली जात होती. जेव्हा या सर्वांची तुलना घरी बनवलेल्या पेपर फिल्टर कॉफीशी केली गेली तेव्हा ऑफिस कॉफी आरोग्याच्या (Health) बाबतीत मागे पडली.
स्वीडनमध्ये करण्यात आलेले हे संशोधन न्यूट्रिशन, मेटाबोलिझम अँड कार्डिओव्हस्कुलर डिसीजेस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधना असे दिसून आले की, ऑफिस कॉफी मशीनमधून मिळणाऱ्या कॉफीमध्ये असे काही घटक आढळले जे शरीरात 'बॅड' कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल वाढवू शकतात. या घटकांची नावे कॅफेस्टोल आणि काहवेओल अशी आहेत. ही नावे विचित्र वाटत असली तरी त्यांचा थेट हृदयावर (Heart) परिणाम होतो. संशोधनात पुढे असेही आढळून आले की, जर लोक आठवड्यातून फक्त तीन वेळा ऑफिस कॉफीऐवजी पेपर फिल्टर कॉफी पितात तर त्यांच्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी हळूहळू कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की, तुम्ही छोट्या सवयी बदलून तुमच्या हृदयाची काळजी घेऊ शकता.
दरम्यान, या संशोधनाच्या निकालांमधून ऑफिस व्यवस्थापनानेही धडा घेतला पाहिजे. कदाचित ऑफिसमध्ये चांगले फिल्टर कॉफी मशीन आणण्याची किंवा कर्मचाऱ्यांना घरुन स्वतःची फिल्टर केलेली कॉफी आणण्यास प्रोत्साहित करण्याची वेळ आली आहे. कॉफी पिणे सोडणे हा पर्याय नसून ती घेण्याची पद्धत सुधारणे हा पर्याय ठरु शकतो.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, संतुलित प्रमाणात कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे टाइप 2 मधुमेह, अल्झायमर आणि यकृताशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही घरी बनवलेली कॉफी पिऊ शकता किंवा दुकानात बनवलेली कॉफी खरेदी करु शकता. मशीन कॉफीपासून दूर राहून तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.