Love

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

प्रेमाची उब...

सर्वात मोठी उपासमार होत असेल तर ती प्रेमाची. वृध्द माता पित्यांना त्याची भूक असते. दिव्य प्रेमाचा अवकाश आभाळाएवढा असतो.

दैनिक गोमन्तक

हल्लीच एक पुस्तक वाचत होतो. प्रेम रावत यांचं. त्यांनी आपला एक अनुभव कथन केला आहे. गाडीतून उतरलो. सुपुत्रही उतरला. त्यानं अचानक घब्ब करून दरवाजा मारला. ते सांगतात, आपलं बोट चिरडून इतकं दुखलं, दुखलं की सांगता सोय नाही. त्यावेळी मुलगा लहान होता. आपण विव्हळलो. पण राग दाबला, नाही व्यक्त केला. कारण हा शो, सीन तिथं चारचौघात करून काही निष्पन्न होण्यासारखं नव्हतं. बोट दुखतच होतं. आपण मुलाला सांगितलं, चल आपण थोडं चालत जाऊन येऊ. वाटभर चिरंजीव विचारत होता, दुखत नाही ना? जास्त लागलं नाही ना? लेखक रावत पुढं लिहितात, माझं बोट फारच दुखत होतं. पण मानसिक भावना दुखायच्या थांबल्या होत्या. त्यांना आपण थोपवलं होतं. शारीरीक वेदना होत्या, अशा प्रसंगी आपण खोल आतवर ह्दयाच्या प्रेमाकाशात जावं असं ते म्हणतात.

आपण आपल्यात विशुध्द प्रेम विकसित करावं. असं प्रेम (Love) की ज्यात आपण तरंगत राहू. दिव्य प्रेम. प्रेम हे भाषा शब्द यांच्या पल्याड असतं. आमच्या आत जितकं खोल खोल जाऊ तिथं शब्द अबोल होतात. दर दिवशी असे प्रसंग उद्भवतात की माफ करावं लागतं. त्याच्याविना पर्याय नसतो. माफ करून पुढं जावं. पुढील यात्रेला. माफ करणं याचा अर्थ असा नव्हे की त्या नालायक वागण्याची मिडियोक्रीटी आपण स्वीकार केली. फक्त आपली उर्जा, वेळ बरबाद होणार, तीच तीच कडू आठवण त्रास करत राहणार म्हणून ती सोडून देवून आपण पुढं मार्गक्रमण करावं. माफ करायला स्वच्छ हृदय लागतं. म्हणजेच प्रेमानं माफ करणं आलं.

स्वच्छ हृदय हा प्रेमाचा पाया आहे. स्वच्छ हृदयातील प्रेम हे माणुसकीचं पहिलं लक्षण. शर्ट धुतो. आम्ही स्नान घेतो. हृदयाला साफ करायला नको का दर दिवशी? जॉगिंग करतो, धावतो, चालतो. हृदयात कचरा, विकार, चरबी यांचा पाचोळा वाढेल म्हणून उपाय नको का? विशुध्द विचार हृदय स्वच्छ करतात. तिथं उपजणारं प्रेम हे सुंदर असतं. त्यात आशा, अपेक्षा, अट, शर्त, तर्क, स्वार्थ काहीही नसतं. हकीकत सांगतो. दिल्लीला होतो. काही वर्षापूर्वी. माझा मित्र तेल कंपनीत इंजिनियर आहे. अगोदर तो गोव्यात होता. हिंदी भाषिक. मी माझं काम करून हॉटेलात जायचो. आग्रहच करू लागला... घरी ये. तो घेऊन गेला. त्याचवेळी त्याची सौ, जी विमान कंपनीत हवाई सुंदरी होती, ती दुबईचा मोठा टूर करून आली होती. साहजिकच थकली असणार.

काय झालं कोणास ठाऊक. माझ्या मित्राचं व सौ.चं आत थोडंसं वाजतं, हे मला आवाज वलयांवरून जाणवलं. ती थकून आली आहे आणि आपण मित्राला घेऊन आलो आहे म्हणून तरी यानं गप्प चूप बसायला पाहिजे होतं, असं मला वाटलं. नंतर याला खाऊ काय गिळू असं चिंतन करत मी माझ्या आत चाललेली क्रोधाची भावनांची घुसळण भडका टिपत होतो. दोन मिनिटात मित्राचे वृध्द वडील बाहेर आले. तोपर्यंत मित्राचं आतील वादाचं वादळ शांत झालं होतं. खजिल तोंड करून माझा मित्र बाहेर आला होता.

मित्राने वडिलांकडे ओळख करून दिली. माझा मूड खराब झाला होता. खाणं वगैरे दूरच राहिलं. शिवाय उत्तर भारतीय पदार्थ तसे गोवेकरांना फारसे रूचतही नाही. इतक्यात थोडंसं बोलून मित्राचे वडील माझा हात पकडून बोलले – बेटा, हम खाना खायेंगे ना? काय सांगू, त्यांच्या हाताचा तो कोमल स्पर्शरूपी गहिरं प्रेम माझ्यात खोल परिणाम करून गेलं. त्या आवाजात विनंतीवजा सूचना होती. ती पालन करण्याखेरीज काही उरलं नव्हतं. डोळ्यात पाणी आलं, इतकं स्निग्धतापूर्ण प्रेम. हां, पिताजी, मी म्हटलं. मित्राविषयीचा रागही कुठल्याकुठं नाहीसा झाला. त्या दिवशी मी जे जेवलो त्याला तोड नाही. प्रेमाची ताकद ती ही.

सर्वात मोठी उपासमार होत असेल तर ती प्रेमाची. वृध्द माता पित्यांना त्याची भूक असते. दिव्य प्रेमाचा अवकाश आभाळाएवढा असतो. मातेचं वात्सल्यरूपी प्रेमामृत ममताळूपणा प्राशन करूनच आपला जीवनारंभ होतो.

जगप्रसिध्द कवी रूमी यांच्या काव्यात प्रेमाचे उल्लेख शब्दागणिक येतात. तो म्हणतो -

प्रेम देताना, विहिरीच्या खोलीतून नका देवू

भरून उतू जात असलेल्या, हृदय पात्रातून सहज द्या

हल्लीच एका तत्वचिंतकाचं एक सुंदर वाक्य वाचलं. तो सांगतो – बूट आणि मनुष्य हर्ट करतो तेव्हा समजावं, तो माझ्या आकाराचा नाही. म्हणूनच जिथं जुळतं, जिथं कळतं, उमज समज आहे तिथंच प्रेम द्यावं. सत्पात्री.

मूठभर द्यावं, सूपभर येतं

हा प्रेमनियम आहे. कितीतरी पटींनी ते परत येतच. एका पातळीवर हे प्रेम करूणेत रूपांतरीत होऊन जातं. दात्यानं असं द्यावं, इतकं द्यावं की त्या औदार्याच्या सौंदर्याला सीमा नसावी. भानच नसावं. परिणामांची चिंता नको करू तू. येतील ऋतू. प्रेममय फुलांचे, फळांचे. त्या रसमय माहोलात समरस होऊ.

असे प्रेमरसात आकंठ बुडालेले संत रूमी. ते सांगतात -

कुठंही असा, काहीही करा, प्रेमात राहा.

- मुकेश थळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT