बारा-पंधरा वर्षांपूर्वी 'सर्व शिक्षण अभियान'चा एका प्रकल्पाचं काम आमच्या संस्थेकडे आलं होतं. शाळेत न जाणाऱ्या, मधेच शाळा सोडून दिलेल्या मुलांचं म्हणजेच 'ड्रॉप आऊट' विद्यार्थ्यांचा सर्व्हे यात करायचा होता. प्रत्येक घरी जाऊन त्या घरातील सर्व मुलं शाळेत जात आहेत ना, हे तपासायचं होतं. विशेषतः जिथे मजुरांची वस्ती आहे, अशा भागावर आम्ही जास्त केंद्रित केलं होतं. ओल्ड गोवा भागात सर्व्हे सुरु होता. अशा सर्व्हेच्या वेळी जेवणाचा प्रश्न कायम समोर असतो. कोणत्या भागात आहेत त्यावर खूपदा जेवण अवलंबून असतं. पंधरा वर्षांपूर्वी ओल्ड गोव्याच्या आसपासच्या भागात तितके चांगले पर्याय नव्हते. या भागात तीन चार टीम काम करत होत्या. त्यातील एका टीमला घेऊन मी रायबंदर सर्व्हे करत होते. दुपारची वेळ होती.
श्रीपाद नाईक राहतात त्याच भागात हा सर्व्हे सुरु होता. त्यांच्या घराच्या विरुद्ध दिशेच्या भागात त्यावेळी वासुदेव तांबा यांची छोटीशी खाण होती. या वस्तीत आम्हाला मजुरांची अनेक कुटुंब मिळाली, ज्यांच्या मुलांनी मधेच शिक्षण सोडून दिल होतं. अशी कुटुंब आमच्यासाठी त्यावेळी महत्वाची होती म्हणून जेवणखाण विसरून आम्ही त्या कुटुंबांची आणि त्यांच्या मुलांची माहिती घेण्यात व्यस्त झालो. पण जसं काम संपलं तशी पोटाला भुकेची आठवण झाली. मातीची वाट तुडवत आम्ही सगळे मुख्य रस्त्याच्या दिशेनं निघालो तर तेफळं घातलेलं हुमण आणि चरचरीत तळलेल्या मासळीचा सुवास सर्वत्र दरवळत होता. आधीच भुकेनं पोटात कावळे ओरडत होते त्यात अशा प्रकारच्या सुवासाने भूक अधिकच वाढली. थोडं अंतर चालत गेल्यावर एका छोट्याशा घरात खानावळ सोबत बार असल्याचं दिसलं. अशा भागात अतिशय साध्याशा वातावरणात गरम गरम जेवणाची सोय होणंदेखील किती महत्वाचं असतं हे त्यावेळी समजलं. त्यावेळी कोणी साधंसं डाळ भाताचं जेवण जरी दिलं असतं तर त्यावर आम्ही तुटून पडलो असतो अशी परिस्थिती झाली होती. तिथं बघितलं तर सगळा कामगार वर्ग जेवायला बसलेला. बायका जवळ जवळ नव्हत्याच. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो असतो तर या जेवणालादेखील मुकावं लागलं असतं.
त्यामुळे रेस्टोरंटच्या (Restaurants in Goa) मालकाने आम्हाला जेवायला जागा करून देताच मुकाट्याने त्या जागी जाऊन आम्ही जेवणाचे ताट येण्याची वाट बघत बसलो. भूक इतकी लागली होती की त्यावेळी त्या रेस्टोरंन्टचे नाव काय आहे याकडे देखील लक्ष गेलं नाही. समोर आलेली नुस्त्याची थाळी बघून जीव भांड्यात पडला. शीत - हुमण, तळलेले नुसते, कढी, वालाची भाजी, साधंसं पण एकदम रुचकर जेवण जेवून तृप्त झाले. नुकतीच मासळी खायला शिकले होते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या हूमणाची चव घेऊन बघण्यात उत्सुकता असायची. इथलं हुमण तसं मला एकदम वेगळ्या चवीचं वाटलं. त्यानंतर मात्र कधीही या रेस्टोरंट मध्ये जाण्याचा योग्य आला नाही. पण तिथल्या जेवणाची चव कायम स्मरणात राहिली.
त्यानंतर बरोबर पंधरा वर्षांनी परत याच रेस्टोरंटमध्ये जाणं झालं. आता ते पूर्वीसारखं साधंसं राहिलं नाही. छान भक्कम बांधकाम करून त्याचा सुंदरसा विस्तार झाला आहे. तिथे 'कुट्टीकर बार अँड रेस्टोरंट' (Kuttikar Bar & Restaurant) अशी पाटीदेखील झळकतेय. पूर्वी तांबा यांच्या खाणीतील कामगार तिथे जेवायला येत असत तेव्हा या रेस्टोरंन्टच विस्तार तेवढ्यापुरता मर्यादित होता. पण आता हे रेस्टोरंट फक्त कामगारांपुरतं उरलं नाही. आता इथलं वातावरण देखील काळाच्या ओघात बदलून गेलं आहे. पूर्वी इथं जेवायला आलेल्या बायका जवळ जवळ दिसत नव्हत्या. पण आता त्यांची संख्या देखील वाढली आहे. सर्व प्रकारचे खवय्ये इथं येतात. अशी रेस्टोरंट शोधण्याचं काम गुगल मॅपने तर आता अधिक सोप्प केलंय आणि त्यामुळे देशी विदेशी पर्यटक देखील कुट्टीकर रेस्टोरंटमध्ये व्यवस्थित पोहोचतात.
मासळीसाठी प्रसिद्ध
'कुट्टीकर बार आणि रेस्टोरंट' मध्ये गेल्यावर काय खावं? तर इथे ताजी ताजी मासळी डोळे झाकून खावी. ताज्या मासळीसाठीच हे रेस्टोरंट प्रसिद्ध आहे. खूप मोठा झगमगाट नाही. अगदी साधंसं वातावरण आहे पण मासळी खाण्याचं खात्रीदायक ठिकाण म्हणून प्रसिद्ध पावलंय. पूर्वी साधीशी फिश थाळी मिळायची पण आता यात त्यांनी मुद्दाम बदल केलाय. या थाळीत शीत-हुमण बरोबर कुल्ल्यांचे तोणाक, आंबट तीख, किसमूर नाहीतर सलाड, लोणचे आणि तळलेल्या नुस्त्याची पोस्तं, अशी भरगच्चं थाळी आता मिळते. तुम्ही थाळी वगळून फक्त छान, चरचरीत तळलेली मासळी ऑर्डर करू शकता. इथं येणारे खवय्ये मासळी खायलाच येतात. फक्त मासळीवर ताव मारायला येणाऱ्या खवय्यांसाठी म्हणून इथल्या मालकांनी कुट्टीकर यांनी स्वतंत्रपणे फक्त शीत - हुमण द्यायची सोय केली आहे. मासळी खाऊन पोट भरलं की वेगळी फिश थाळी खाण्यासाठी पोटात जागा नसते मग अशा वेळी एक वाटी शीत आणि हुमण ऑर्डर करता येते. हेच या जागेचं वेगळेपण आहे. ग्राहकांच्या पोटाचा विचार करून पदार्थ सर्व्ह करण्याची चांगली पद्धत त्यांनी सुरु केली आहे. याचाच फायदा उठवत आम्ही देखील इथं बऱ्याच वर्षानंतर ताज्या ताज्या मासळीवर ताव मारला. इथले शिनाणे रवा फ्राय फारच प्रसिद्ध आहेत. खूपजण मुद्दाम तेच खायला येतात. इथं शिंनाणे एकदम ताजे ताजे मिळतात. मासळीला इथे तोटा नाही. तुम्हाला पाहिजे ती मासळी पाहिजे तशा मसाल्यात करून मिळते.
नुकतेच इथं जेवायला गेले होते तर केरळ मधले खूप पर्यटक कुट्टीकर बार आणि रेस्टोरंट शोधत आले होते. त्यातल्या एकाला मी विचारलं केरळमध्येही खूप चांगली मासळी मिळते ना... तर त्यावर तो म्हणाला कि मिळते, पण प्रचंड महाग आहे. त्या तुलनेत गोव्यातली मासळी एकदम स्वस्त आहे आणि म्हणूनच आम्ही इथं कुठे ताजी मासळी चांगली मिळते हे शोधून तिथे जातोय. या केरळी पर्यटकाने कुट्टीकर बार आणि रेस्टोरंट असेच शोधून काढले. तो इथं छान खरपूस तळलेल्या विसवणाच्या (सुरमईच्या) पोस्तावर ताव मारत होता. मासळी व्यतिरिक्त इथं चिकन - मटण - वेगवेगळ्या प्रकारचं 'तोणाक' मिळते. पण ते फक्त रात्रीच उपलब्ध असतं आणि फिश थाळी ही फक्त दुपारीच उपलब्ध असते. आता इथे इतके लोक जेवायला येत असतात की बराच वेळ आपला नंबर लागायची वाट बघावी लागते. इथं होणाऱ्या गर्दीवर इथल्या व्यवस्थापनाचं नियंत्रण नाही, हीच तेवढी इथली लंगडी बाजू आहे. लोकांना व्यवस्थित बाहेर थांबायला सांगून मग एक एक करून बसायला जागा उपलब्ध करून देण्याची शिस्त नाही आणि हेच टाळायचं असेल तर दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान इथं गेलं पाहिजे. तरच ही गर्दी टाळून शांतपणे जेवू शकतो. हे रेस्टोरंट ओल्ड गोवा - रायबंदर मुख्य रस्त्यापासून जरासं आतल्या रस्त्यावर असल्यामुळे पटकन लक्षात येत नाही. पण एकदा इथे जेवून गेलेला माणूस न विसरता परत कधी न कधी जेवायला आणि त्यापेक्षाही ताजी ताजी मासळी खायला इथे येतोच.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.