‘ते’ कोण हे सांगणारे ‘प्रेरणा रुख’ Dainik Gomantak
लाइफस्टाइल

‘ते’ कोण हे सांगणारे ‘प्रेरणा रुख’

ज्यांनी राजाराम पैंगीणकर यांचे ‘मी कोण’ हे आत्मचरित्र वाचले असेल त्यांना गोमंतक मराठा समाजात शंभर - दिडशे वर्षापूर्वी जन्मलेल्या एका मुलाची तगमग काय असेल याची कल्पना येईल.

दैनिक गोमन्तक

ज्यांनी राजाराम पैंगीणकर यांचे ‘मी कोण’ हे आत्मचरित्र वाचले असेल त्यांना गोमंतक मराठा समाजात शंभर - दिडशे वर्षापूर्वी जन्मलेल्या एका मुलाची तगमग काय असेल याची कल्पना येईल. पण २ आॅक्टोबर १९१० साली गोव्यातल्या पैंगीण या गावात भरलेल्या एका एेतिहासिक सभेत या समाजाने जी क्रांतिकारी भूमिका घेतली त्यातून या समाजाला उर्ध्वगती मिळाली. राजाराम पैंगीणकर स्वतः या सभेचे अग्रगणी नेते होते. आज हा समाज गोव्याच्या प्रगतीशील वाटचालीत स्वतःचे महत्त्वाचे योगदान देतो आहे.

मागच्या शंभर वर्षात संघर्षमय परिस्थितीशी झुंज घेत, ह्या समाजातल्या समाजधुरीणांनी, सकारात्मक घोरणे स्वीकारून ज्या तऱ्हेने प्रगतिपथ आखला त्या इतिहासाचे चित्रण संजीव वेरेकर यांनी त्यांच्या ‘प्रेरणा रुख’या २२४ पानी पुस्तकात आपल्या संजीवी शैलीतून मांडला आहे. (या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणाऱ्या डॉ. नंदकुमार कामत यांनी त्यांच्या प्रस्तावनेत ‘संजीवी शैली’ हा शब्द त्यांच्या लेखनशैलीसाठी वापरला आहे.)

ज्यांना गोव्याचे आगरकर म्हटले जाते ते नारायणराव कारवारकर मराठे तसेच उपरोल्लेखित राजराम पैंगीणकर यांनी आपल्या विचारांना समाज आधुनिक बनवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे चित्रणदेखील ‘प्रेरणा रुखा’चा भाग आहे. १९२५ साली त्यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या ‘गोमंतक मराठा समाजा’ला आणखी तीन वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या कठीण काळात या समाजाने शिक्षणाला प्राधान्य देऊन, त्यांच्यावर विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी लादलेल्या परंपरांना तिलांजली दिली. विधवांना पुनर्विवाह करण्याची मोकळीक आणि हुंडा न देता मुलींची लग्ने या काळापुढच्या विचारांना बंडखोरपणे स्वीकारून त्यांची अंमलबजावणी केली. गोव्याच्या मुक्तीपूर्व काळात वीसपेक्षा जास्त शिक्षणसंस्था या समाजाने उभारल्या. यातच या समाजाचा आधुनिक व शिक्षणाग्रही दृष्टिकोन दिसून येतो. ज्या समाजाकडून पिढ्यान् पिढ्या अन्याय घडला त्याच समाजामधल्या सुधारकांना सोबत घेऊन त्यांनी ज्यातऱ्हेने स्वतःला घडवले त्यात त्यांची पूर्वग्रहांना गंगार्पण करण्याची वृत्ती दिसून येते. गोमंतक मराठा समाजाच्या त्या साऱ्या विशेषांना संजीव वेरेकर यांनी आपल्या या पुस्तकास स्थान दिले आहे.

डॉ. शामराव मुळगांवकर, जागतिक कीर्तीचे प्रसूतीशास्त्र संशोधक तज्ज्ञ डॉ. विठ्ठलराव शिरोडकर, देशाच्या औद्योगिक जगतातले आदर्श सुमंत मुळगांवकर, देशातल्या रक्तदान चळवळीच्या अध्वर्यू शीला मुळगांवकर, ९वे हवाईदल प्रमुख, एअर चिफ मार्शल ह्रषिकेश मुळगांवकर, पर्यटन व्यवसायाचे शिल्पकार अजीत कारेकर, महान चित्रकार विश्‍वनाथ नागेशकर आंतरराष्ट्रीय नाणेनिघीचे पहिले भारतीय उपसंचालक प्रभाकर नार्वेकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गोमंतकीय सूपूत्रांच्या कर्तृत्वाची ओळख ‘प्रेरणा रुख’ ह्या पुस्तकातून संजिव वेरेकर आपल्याला करुन देतात. त्याखेरीज आधुनिक गोमंतकाला आकार देणारे गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर ते समाजसेवक अशोक बाणस्तरकर अशा निवडक व्यक्तिमत्त्वाचे चित्रणही या पुस्तकात आहे.

लेखक संजीव वेरेकर यांनी हे पुस्तक गेली दोन वर्षे संशोधन करुन लिहिले आहे. संजीव म्हणतो, जागतिक पातळीवर योगदान देणाऱ्या या गोमंतकपुत्रांची दखल गोव्याच्या प्रशासनाने योग्यरित्या घेतलेली नाही. प्रशासन कदाचित या लोकांबद्दल अनभिज्ञही असेल, मात्र आपल्या पुस्तकातून प्रशासनाला या लोकांची ओळख होईल अशी अपेक्षा तो बाळगतो. ‘प्रेरणा रुख’ चे प्रकाशन उद्या दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गोमंतक मराठा समाजाच्या राजाराम पैंगीणकर स्मृती सभागृहात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT