गोव्यात (Goa) दिवाळीत मात्र याच पोह्यांना मोठं महत्त्व प्राप्त होतं.
गोव्यात (Goa) दिवाळीत मात्र याच पोह्यांना मोठं महत्त्व प्राप्त होतं. Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोव्यात दिवाळीत फराळापेक्षा पोह्यांना मोठं महत्त्व

Manaswini Prabhune-Nayak

दिवाळीची (Diwali) पहाट रांगोळी, उजळलेले दिवे, अभ्यंगस्नान आणि फराळ (Faral) याशिवाय अपुरी. दिवाळी म्हणलं की सगळी प्रतीकं डोळ्यासमोर येतात. पूर्वी दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा-लाडू, चकली-शेव, शंकरपाळी, करंजी हे पदार्थ ठरलेले असायचे. याशिवाय दिवाळीची कल्पना करू शकत नव्हते. पण गोव्यात (Goa) आले आणि इतके दिवस मनावर कोरलं गेलेलं दिवाळीचं चित्र पूर्ण बदलून गेलं. चकली-शेव, शंकरपाळी, करंजी या पदार्थांची जागा 'पोह्यां’नी (Pohe) घेतली. एरवी वर्षभर पोह्यांकडे ढुंकून बघितलं जात नाही. पण दिवाळीत मात्र याच पोह्यांना मोठं महत्त्व प्राप्त होतं.

हा तसा फारच घरगुती प्रकार. घरात नाष्ट्यासाठी पटकन काही तरी बनवायचं असेल तर हमखास पोहे बनवले जातात. अचानक कोणी पाहुणे आले तर झटपट पोहे बनवले जातात. पोह्यांचे प्रकारदेखील वेगवेगळे. कांदापोहे, बटाटा घालून केलेले पोहे, दडपे पोहे, कच्च्या पोह्यांना नुसतं तेल तिखटमीठ लावून केलेले, दह्यातले फोडणी दिलेले असे असंख्य प्रकाराने घराघरात पोहे बनवले जातात. पोह्यांची ही सगळी घरगुती रूपं. पण पोह्यांना खरी प्रतिष्ठा दिली ती इंदोर-नागपूर आणि पुणे या शहरांनी. घरात बनवल्या जाणाऱ्या पोह्यांना छान व्यवसायाचं रूप या शहरांनी दिलं. घराघरात बनवले जाणारे पोहे बाजारात विकले जाऊ लागले. फास्टफूड अनेक प्रकार उपलब्ध होते, पण सकाळी नाष्ट्याला ते पदार्थ खाणं तब्येतीला न मानवणारं. मधला काळ असा होता की या काळात घरगुती पदार्थांची मागणी वाढली. लोकही आरोग्याबाबत जागरूक झाले. मागणी तसा पुरवठा म्हणतात ना. तसं या बाजारपेठांत पोह्यांना उचलून धरलं.

इंदोरच्या पोह्यांची चव फारच वेगळी शिवाय इथली पोहे खायची पध्दतदेखील अतिशय निराळी. इथं पोह्यांची जोडी जिलेबीबरोबर जुळलीय. जिलेबी बरोबर पोहे खाण्याचा कधी विचारही मनात आला नव्हता. पण इंदोरमध्ये पोहे आणि जिलेबी ही जोडी एकदम प्रसिद्ध. नुसते पोहे खाण्यात मजा नाही. एक घास तिखट पोह्यांचा आणि एक घास गोड जिलेबीचा. तिखट आणि गोड यांची आगळीवेगळी जोडी इंदोरमध्ये बघायला मिळाली तर नागपूरच्या पोह्यांची आणखी वेगळीच पध्दत. नागपूरचे तर्री पोहे प्रसिद्ध. मी हे पोहे कधी खाल्ले नाहीत पण खवय्या पत्रकार मित्र रोहन नामजोशी या 'तर्री ' पोह्यांचं असं काही रसभरीत वर्णन करतो की नागपूरला जाऊन तुम्ही तर्री पोहे न खाताच आलात तर पाप लागू शकतं असंच वाटत राहतं.कधीतरी हे पोहे खाऊन बघायचे आहेत. इंदोर आणि नागपूर या दोन्हीही शहरांच्या तुलनेत पुण्यात मिळणारे पोहे हे अतिशय घरगुती पध्दतीने आहेत. बाहेर गावाहून पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय स्वस्त आणि मस्त असा नाष्ट्याला प्रकार पोळ्यांच्या रूपात मिळाला. गरम गरम कांदे पोहे त्यावर खोबरं- कोथिंबीर आणि कुरकुरीत शेव घालून देतात. मऊ लुसलुशीत पोह्यांसोबत कुरकुरीत शेव छान लागतो. पुण्यात चौकाचौकात असे पोहे मिळतात.

वर्षभर अधूनमधून पोहे बनवले जातात त्यामुळे सणवाराला पोह्यांना तसं महत्त्व कमीच. गोव्यातल्या दिवाळीत मात्र पोह्यांचं महत्त्व समजलं. पूर्वी बऱ्याच घरांमध्येच पोहे कांडप ज्याला 'लाट' म्हणतात ते घरातच सारवलेल्या जमिनीत बसवलेलं असायचं.घरातील एक महिला त्या लाट्याला पायाने जोर देऊन त्याखाली उकडलेल्या तांदळाचे दाणे पोहे करायला ठेवायची तर दुसरी महिला ते पोहे नीट व्हावेत यासाठी मदत करायची. हे करत असताना भाताचा मंद असा सुगंध आजूबाजूला पसरायचा. जवळपास कोणाच्या तरी घरी पोहे बनवले जात आहेत याची वार्ता सर्वत्र पसरलेला मंद सुगंध आपोआप पोहोचवायचा. पोहे तयार होत असताना घरातील लहान मुलं हातातील सगळे उद्योग सोडून पोहे कसे बनतात यापेक्षा ते खायला कधी मिळतील याकडे लक्ष ठेवून असायची. आता मात्र घरी पोहे बनवणं बंद झालंय. आता दुकानातून तयार पोहे आणले जातात. दिवाळीच्या रम्य आठवणी मागच्या पिढीतील प्रत्येकाने जपून ठेवल्या आहेत.

दिवाळीत खास बनवल्या जाणाऱ्या पोह्यांची मी चाहती आहे. रसातले, दह्यातले- ताकातले, तिखशे-गोडशे, गुळ आणि खोबरं घातलेले असे विविध प्रकारचे- वेगवेगळ्या चवीचे फोव सोबत तिखट-आंबट चवीच्या आंबाड्याची 'करम' हा नरकचतुर्थीला बनवला जाणारा वेगळाच फराळ. प्रांत बदलेल तसे खाद्यपदार्थ देखील बदलत जातात. सण साजरे करण्याची पध्दतदेखील बदलत जाते. उत्तरेकडील दिवाळी साजरी करण्याची आणि दक्षिणेकडील दिवाळी साजरी करण्याची पध्दत फार वेगळी असून त्यात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची लज्जतदेखील वेगळी आहे. वर्षभर बनवले जाणारे पोेहे कोकण - गोवा भागात अतिशय महत्त्वाचे ठरतात.

वर्षभर अधूनमधून पोहे बनविले जातात त्यामुळे सणवाराला पोह्यांना तसे महत्त्व कमीच. गोव्यातल्या दिवाळीत मात्र पोह्यांचे महत्त्व समजले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT