KADAMBAS Of Goa
KADAMBAS Of Goa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

इतिहासाच्या पाऊलखुणा: राजा प्रथम जयकेशी

दैनिक गोमन्तक

प्रजल साखरदांडे

राजा प्रथम जयकेशी हा द्वितीय शष्ठदेवाचा पुत्र आणि वीरवर्मादेवाचा बंधू होता. रूपादेवी ही त्यांची महाराणी होती. ‘भोप्पादेवी’या नावानेही ती ओळखली जायची.

त्याच्या नावाचे दोन ताम्रपट उपलब्ध आहेत :- पहिला गोपका ताम्रपट (देणगीपत्र) (इ.स. 1053) आणि दुसरा इ.स. 1059 मधील पणजी ताम्रपट. दोन्ही ताम्रपट सध्या मुंबईत जतन करून ठेवले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या नावाचे दोन शिलालेखही उपलब्ध आहेत: इ.स. 1054 मधला पणजणीखाणी शिलालेख आणि राय येथील इ.स. 1071 मधला शिलालेख.

गोपका या ताम्रपटात कोरलेल्या मजकुरानुसार, इ.स. 1052 मध्ये राजा प्रथम जयकेशीने जुवारी नदीवरील गोपाका बंदरावर नौसेनेचा भक्कम तळ उभारला होता. शिलाहारांच्या राजवटीत गोपका बंदरावरील ताज्जिक अथवा अरब यांच्याशी या तळाशी निगडित समुद्री व्यापाराचा करार केला गेला होता. सद्दाम ऊर्फ छद्दाम या अरब व्यापाऱ्याने गोमंतकातील पहिले नौदल बांधण्यासाठी प्रथम जयकेशीला सहकार्य केले होते. प्रथम जयकेशीने प्रधानमंत्री म्हणून सद्दामची नेमणूक केली होती. 'लघुमुरूअंबिका' (सध्याचे मेरशी) आणि 'श्री चैमूल्य' (सध्याचे चिंबल) ही दोन्ही गावे छद्दाम ऊर्फ सद्दामला देणगी म्हणून दिल्याची नोंद पणजी ताम्रपटात आढळते. 'लघुमुरूअंबिका' या गावात मशीद बांधण्यासाठी सद्दामला जमीनही देणगी म्हणून देण्यात आली होती.

प्रथम जयकेशीने गोवापुरी – गोपकापट्टण येथे भव्य राजवाडा बांधून आपली राजधानी सुशोभित केली. त्याच्या अरब प्रधानमंत्र्याने गोपकापट्टण येथे मशीद बांधून 'मिजीगिट्टी' नामक धर्मादाय संस्थेची स्थापना केली. गरीब, यात्रेकरू, इत्यादींचे हे आश्रयस्थान होते. जयकेशीने सुंदर अशा मंदिरांची आणि तलावांची बांधणी केली. 'कुजमोरायाची तळी' हे त्याचे उत्तम एक उदाहरण होय.

'लघुमुरूअंबिका' या शब्दाची फोड करून त्याची व्युत्पत्ती सांगता येते. 'लघु' म्हणजे लहान, कन्नडमध्ये 'मुरू' म्हणजे तीन आणि 'अंबिका' हे देवीचे नाव. आजही या गावात तीन प्रमुख वाडे असल्याचे दिसून येतात. उदा: 'मुरूंबिण-ओ-ग्रांडे', 'मुरूंबिण-ओ-पिकेन' (लघु). इथे कन्नड मधील 'मुरू' या शब्दाचे पोर्तुगीजीकरण होऊन 'मुरूंबिण' असे बदललेले रूप दिसते. सध्याचे या गावाचे नाव 'मेरशी' हे सुद्दा जयकेशीशी निगडित असल्याचे सांगता येते. हे नाव 'मर्सी' या इंग्रजी शब्दावरून पडले. 'मर्सी' म्हणजेच दया. प्रथम जयकेशीने आपला अरब प्रधानमंत्री सद्दाम याला इथे मशीद बांधण्यासाठी जमीन आणि चिंबल गाव देणगी म्हणून दिल्यामुळे हा संदर्भ येतो.

प्रथम जयकेशीने भक्कम असे लष्कर आणि नौसेना यांची बांधणी करून, आपल्या प्रांताच्या कक्षा विस्तारल्या होत्या. प्रथम जयकेशीने पल्लव, चोला, दक्षिण गुजरातचे लट अशा कित्येक राजघराण्यांना पराभूत करून विजय प्राप्त केला होता. गोकर्ण येथील राजा कामदेवाचा पराभव करून प्रथम जयकेशीने कोंकण प्रदेश काबिज केला.

प्रथम जयकेशीच्या राजवटीत गोपकापट्टणच्या बंदरावरील आयात-निर्यात आणि व्यापाराची भरभराट झाली. त्याकाळी श्रीलंका, झंझीबार, कुवेट, केरळ, पांड्या आणि तामिळ, गुजरात ठाणा येथील चोला, यांच्याशी व्यापार व्हायचा. प्रथम जयकेशीची किर्ती सर्वत्र (दूरदेशीसुद्धा) पोहोचली होती. गोमंतकातील कुशल आणि निष्णात कदंब राजांपैकी तो एक गणला गेला. कदंबांची राजधानी असलेल्या गोपकापट्टण या बंदराची प्रसिद्धी अरब देश आणि पूर्व आफ्रिकेपर्यंत पोहोचली.

प्रथम जयकेशीच्या गोमंतकातील राजवटीत हिंदू-मुस्लिम एकोपा होता, हा एक उल्लेखनीय संदर्भ ठरतो. प्रथम जयकेशीच्या कारकिर्दीत पणजी हा गाव कालप्पाचा मुलगा नागण्णा याच्या देखरेखीखाली होता.

प्रथम जयकेशीच्या भारदस्त प्रभावाने गोमंतकीय कदंब आणि इतर राजघराण्यांमध्ये या काळी सोयरिका जुळू लागल्या. 1076 साली, त्याच्या एका कन्येचा विवाह चालुक्य राजपुत्र सहावा विक्रमादित्य याच्याशी झाला. मिनलदेवी या त्याच्या कन्येचा विवाह गुजरातच्या अंहिलवड चालुक्य घराण्याचा राजा पहिला कर्ण याच्याशी करण्यात आला. कर्ण राजाचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा पुत्र युवराज सिद्धराज जयसिंह हा अज्ञान (वयाने लहान) होता. त्यामुळे कर्ण राजाची महाराणी म्हणजेच प्रथम जयकेशीची कन्या मिनलदेवी, हिने गुजरातच्या अंहिलवड प्रांताचा राज्यकारभार सांभाळला. या गोवा कदंबांच्या कन्येला आजही गुजरातमध्ये तिच्या औदार्य आणि दानशूरता या गुणांमुळे स्मरले जाते. तिने सोमनाथाच्या भक्तांचा यात्रेकरू कर रद्द केला होता. ती 'नाईकदेवी' किंवा 'मायनल्लादेवी' या नावानेही ओळखली जायची.

इ.स. 1054 मधील पणजणीखणीच्या शिलालेखात अण्णय्या याचा उल्लेख पणजणीखणीचा (सध्याचे पणजी) धर्म-मंत्री असा करण्यात आला आहे. जयकेशीदेवाच्या मर्जीतला सेवक म्हणून त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

14 व्या शतकातील ‘प्रबंधचिंतामणी’ या ख्यातनाम कलाकृतीत एका दंतकथेची पुनर्रचना करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे :- पाळलेल्या प्रिय पोपटाच्या मृत्यूनंतर, त्याच्या चितेवर जयकेशीने स्वतःला जाळून घेतले. कारण त्याने या पोपटाला त्याच्या सुरक्षिततेचे आश्वासन दिले होते. एका मांजराने त्या पोपटाचा जीव घेतला होता.

प्रथम जयकेशीचा ज्येष्ठ पुत्र तृतीय गुहाल्लदेव हा त्याचा उत्तराधिकारी बनला. तृतीय गुहाल्लदेव हा त्रिभुवनमाला म्हणूनही ओळखला जायचा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: सहा लाखांचा माल जळून खाक; मोलेत बर्निंग ट्रकचा थरार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT