गोव्यात (Goa) गावोगावी फिरताना कुठल्याही हॉटेलमध्ये (Hotels) जा एकच मेनू अगदी ठळकपणे दिसतो तो म्हणजे भाजी पाव (Bhaaji Pav).
(Goa: One of the most popular restaurants for Bhaaji Pav)
मेनू कार्डवर भाजी पाव हा पदार्थ हमखास असतोच. पण प्रत्येक ठिकाणच्या भाजी पावची चव मात्र वेगळी असते. उत्तर गोव्यातील डिचोली हे एक महत्वाचे गाव. तालुक्याचे ठिकाण म्हणूनही महत्वाचे. उत्तर गोव्यात खाण उद्योग ज्या गावांमध्ये आहे त्या साऱ्या गावांना जोडणारे गाव म्हणूनही डिचोली गाव वर्दळीचे ठरते. मी ज्या संस्थेसाठी काम करत होते त्यांचं ऑफिस डिचोलीत होतं त्यामुळे वरचेवर डिचोलीला जावं लागायचं. तर डिचोलीत छोटी मोठी अनेक रेस्टोरंट आहेत जिथे स्थानिक गोमंतकीय पद्धतीचे पदार्थ मिळतात.
डिचोली बाजारपेठेत ' गावठाणकर उपहारगृह ' नावाचं सदुसष्ट (६७) वर्षे जुने रेस्टोरंट आहे. कृष्णा गावठाणकर यांनी १९५३ साली हे उपहारगृह सुरु केलं. गोवा मुक्त होण्या आधीचा काळ होता. तेव्हाही भाजी पाव हाच पदार्थ महत्वाचा होता. पावाने तसे गोमंतकीयांच्या ताटात खूप आधीच स्थान पटकावले होते. शिवाय चपाती लाटून देणारी व्यक्ती नसल्यामुळे अशा छोट्याशा रेस्टोरंटमध्ये पावने हक्काची जागा पटकावली.
'बियो भाजी' प्रसिद्ध
प्रत्येक रेस्टोरंटची ओळख तिथे बनणाऱ्या एखाद्या विशेष पदार्थावर अवलंबून असते. गावठाणकर उपहारगृह हे तिथे मिळणाऱ्या ' बियो भाजी 'साठी प्रसिद्ध आहे. बियो भाजी म्हणजे काजूची भाजी. जवळपास तसेच अन्य गावातले खवय्ये इथे बियो भाजी खायला येतात. मार्च महिन्याच्या मध्यान्हीला ओले काजू मिळू लागतात. त्या काळात गावठाणकर उपहारगृहात या ओल्या काजूची भाजी मिळते. हि ओल्या काजूची भाजी चवीला आणखीनच स्वादिष्ट असते. खोवलेल्या ओल्या नारळला घरगुती गरम मसाल्यात दाटसर वाटून तो या भाजीत घातला जातो. गरम मसाला- खोवलेला ओला नारळ यांचं एकत्रित जे काही रसायन बनतं आणि त्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते. कधी यात बटाटा घातला जातो तर कधी थोडासा फ्लॉवर. यात कोणतीही भाजी वापरू दे मुख्य चव बियोचीच असते. सकाळ-दुपार-संध्याकाळ यातील कोणत्याही वेळी तुम्ही या उपहारगृहात गेलात तर बियो भाजी खाणारे अनेकजण दिसतात.
गावठाणकर उपहारगृहात आता कृष्णा गावठाणकरांची तिसरी पिठी राबते. काळाप्रमाणे उपाहारगृहाच्या रचनेत अनेक बदल झाले. पण चव मात्र तीच आहे. बाकीच्या रेस्टोरंटमध्ये मिळते ती हाळसाणे भाजी, टोमॅटो (टमाट) भाजी, बटाटा (बटाट) भाजी देखील इथे मिळते. पण इथली बियो भाजीच प्रसिद्ध. फक्त 20 रुपयात हि भाजी मिळते. बियो भाजी आणि पाव, सोबत एक गरम गरम मिरची आणि चहा घेतला की पोट भरून नाश्ता झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.