ख्रिसमस हा केवळ सण नसून कुटुंबीय, मित्रपरिवार आणि प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची एक खास संधी आहे. दरवर्षी 25 डिसेंबरला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवानिमित्त जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात चर्चमध्ये विशेष प्रार्थना, घरांची आकर्षक सजावट, ख्रिसमस ट्री, भेटवस्तू आणि सांताक्लॉजच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. काही जण हा सण घरच्या घरी साजरा करतात, तर अनेकांना परदेशात जाऊन ख्रिसमसचा अनोखा अनुभव घ्यायचा असतो. युरोपमधील शेकडो वर्षे जुन्या ख्रिसमस मार्केटपासून ते ऑस्ट्रेलियातील उन्हाळी वातावरणातील उत्सवापर्यंत अनेक ठिकाणांची खास ओळख आहे. यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने परदेशात फिरण्याचा विचार करत असाल, तर जगातील ही सात ठिकाणे तुमच्या प्रवासाच्या यादीत नक्की समाविष्ट करू शकता.
फ्रान्समधील स्ट्रासबर्ग शहराला ख्रिसमसच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त होते. येथील 'क्रिस्टकिंडल्समारिक' हे युरोपमधील सर्वात जुन्या ख्रिसमस बाजारांपैकी एक असून त्याची परंपरा 1570 पासून सुरू आहे. डिसेंबरमध्ये शहरातील ऐतिहासिक रस्ते रंगीबेरंगी रोषणाईने सजवले जातात. लाकडी स्टॉल्सवर विविध सजावटीच्या वस्तू, हस्तकला, भेटवस्तू आणि स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. प्लेस क्लेबर येथील भव्य ख्रिसमस ट्री हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथे मिळणारे पारंपरिक ब्रेडले बिस्किट आणि स्थानिक मिठाई चाखण्याची संधीही मिळते.
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना ख्रिसमसच्या दिवसांत एखाद्या परीकथेतील शहरासारखी दिसते. ऐतिहासिक इमारती, सुंदर चौक आणि आकर्षक रोषणाई यामुळे येथील वातावरण पर्यटकांना भुरळ घालते. राथाउसप्लात्झ येथील ख्रिसमस मार्केट विशेष प्रसिद्ध आहे. या बाजारात हस्तकलेच्या वस्तू, ख्रिसमसच्या सजावटीचे साहित्य, भेटवस्तू आणि विविध खाद्यपदार्थ मिळतात. याशिवाय सिटी हॉल पार्कमध्ये बर्फावर स्केटिंग करण्याचाही आनंद घेता येतो. शॉनब्रुन पॅलेस परिसरातील ख्रिसमस मार्केटही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
जर्मनीतील न्युरेमबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केट जगभर प्रसिद्ध आहे. येथील 'क्रिस्टकिंडल्समार्कट'मध्ये जवळपास 180 लाकडी स्टॉल्स लावले जातात. पारंपरिक खेळणी, सजावटीच्या वस्तू आणि स्थानिक हस्तकला येथे पाहायला मिळतात. मात्र, या बाजाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील खाद्यसंस्कृती. प्रसिद्ध लेबकुचेन जिंजरब्रेड, न्युरेमबर्ग सॉसेज आणि गरम पेये पर्यटक आवर्जून चाखतात. लहान मुलांसाठी खास विभाग असून तिथे कुकी बनवण्यासारख्या मनोरंजक उपक्रमांचाही आनंद घेता येतो.
ख्रिसमस म्हटले की सांताक्लॉजची आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रत्यक्ष सांताक्लॉजला भेटण्याचे स्वप्न असेल, तर फिनलंडमधील रोव्हानिएमी हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे. लॅपलँड प्रदेशातील हे शहर सांताक्लॉजचे अधिकृत निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथील सांता क्लॉज व्हिलेज आर्क्टिक सर्कलवर वसलेले आहे. पर्यटकांना सांताक्लॉजच्या कार्यालयात भेट घेता येते. त्याचबरोबर सांताच्या पोस्ट ऑफिसमधून आपल्या प्रियजनांना पोस्टकार्ड पाठवण्याचा अनुभवही घेता येतो. बर्फाच्छादित परिसरात रेनडिअर आणि हस्की स्लेज राईडचा आनंद घेता येतो.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ख्रिसमस सेलिब्रेशन जगभरात लोकप्रिय आहे. डिसेंबर महिन्यात संपूर्ण शहर आकर्षक रोषणाईने उजळून निघते. येथील रॉकफेलर सेंटरमधील भव्य ख्रिसमस ट्री हे मुख्य आकर्षण असते. त्याशिवाय येथे बर्फावर स्केटिंग करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. फिफ्थ अव्हेन्यूवरील सजवलेल्या दुकानांच्या खिडक्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. तुम्ही हॉलिडे मार्केटमध्ये खरेदी करू शकता, रेडिओ सिटी रॉकेट्सचा प्रसिद्ध कार्यक्रम पाहू शकता किंवा ब्रुकलिनमधील डायकर हाइट्स परिसरातील आकर्षक ख्रिसमस रोषणाईचा आनंद घेऊ शकता.
कॅनडातील क्यूबेक सिटी हे ख्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. येथील जुन्या दगडी इमारती, अरुंद रस्ते आणि बर्फाच्छादित परिसरामुळे संपूर्ण शहर एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे दिसते. ओल्ड क्यूबेक परिसरातील रू डू पेटिट शॅम्प्लेन आणि प्लेस रॉयल या ठिकाणी विशेष रोषणाई केली जाते. येथील जर्मन ख्रिसमस मार्केटमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू आणि भेटवस्तूंची खरेदी करता येते. याशिवाय बर्फावर स्केटिंग आणि हिवाळ्यातील विविध साहसी उपक्रमांचाही आनंद घेता येतो.
ख्रिसमस म्हटले की डोळ्यांसमोर बर्फवृष्टी, थंडी आणि सांताक्लॉजचे चित्र उभे राहते. मात्र, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये ख्रिसमस अगदी वेगळ्या वातावरणात साजरा केला जातो. डिसेंबर हा तेथील उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे लोक समुद्रकिनारे, खुल्या जागा आणि विविध आउटडोअर कार्यक्रमांचा आनंद घेतात. द रॉक्स परिसरातील ख्रिसमस मार्केट विशेष प्रसिद्ध आहे. येथे स्थानिक कलाकारांच्या वस्तू, खाद्यपदार्थ, लाइव्ह संगीत आणि आकर्षक सजावट पाहायला मिळते. मार्टिन प्लेस येथील भव्य ख्रिसमस ट्री हे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. सिडनी हार्बर आणि हार्बर ब्रिजच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस साजरा करण्याचा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरू शकतो.